गाय आणि शेती

सध्या अनेक प्रश्न देशापुढे उभे आहेत त्यातील एक अत्यंत महत्वाचा प्रश्न म्हणजे शेती शेतकऱ्याला परवडेनाशी झाली आहे. त्याचा उत्पादन खर्च आणि उत्पादित शेतीमाल विक्रीतून मिळणार पैसे याचा ताळमेळ बसत नाही. यातूनच अंदाजे २००० शेतकरी रोज शेती सोडत आहेत. काही शेतकरी जमीन विकतात तर काही जण आपल्या पुढच्या पिढीला थोडेफार शिक्षण घ्यायला लावून नोकरीच्या शोधात शहरात पाठवीत आहेत. यामुळे अजूनच हा प्रश्न वाढला आहे. हीच शेतकऱ्यांची मुले अकुशल कामगार म्हणून नावाजलेल्या कंपन्यांमध्ये थोड्याफार पगारावर कामाला रुजू होतात तेथे १४, १४ तास काम करून तुटपुंज्या पैशावर समाधान मानतात. दुर्दैवाने बरेच ठिकाणी असे दिसून येते की घरची शेत जमीन पाण्याखालची असून त्या घरातील मुले दुसऱ्याची नोकरी करत असतात.

दिवसेंदिवस रासायनिक खतांचा, कीटकनाशक आणि तण नाशकांचा खर्च वाढत चालला आहे. रासायनिक खते, किट नाशके आणि तण नाशकांच्या खूप मोठ्या प्रमाणातील वापराने जमीन, पाणी हवा यांचे प्रदूषण देखील होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आणि देशावर मोठे संकटच आहे असे म्हणायला हरकत नाही. कारण या सर्वाचा दुष्परिणाम म्हणजे माणसाला रासायनिक विषाचे अन्न खावे लागते आहे, मोठ मोठ्या रोगांना बळी पडावे लागते. त्यामुळे देशातील क्रय शक्तीचा देखील ऱ्हास होत आहे, उत्पादन क्षमता कमी होत आहे. देशाला आरोग्यावर खूप खर्च करावा लागत आहे. त्यातून कर्ज, अनुदान, आत्महत्या आदी गोष्टींचा न संपणारा प्रश्न तयार आहेच.
रासायनिक खते, कीटनाशके, तण नाशके जी अत्यंत विषारी आहेत त्याने शेतकऱ्याच्या स्वतःच्या जीवाला धोका आहे शिवाय या वस्तू पैसे खर्चून खरेदी करायला लागतात. याची जागा आता जैविक किंवा सेंद्रिय खते आणि औषधे घेऊ लागली आहेत अर्थातच शेतकऱ्याला स्वतःचा पैसा कालांतरानी रासायनिक ऐवजी या गोष्टींसाठी द्यावा लागणार. या सर्व गोष्टींमध्ये शेतकऱ्याला खर्च आहे तो रहाणारच मग त्याचा उत्पादन खर्च कमी कसा होणार ?

या सर्व प्रश्नांचे एकच उत्तर ते म्हणजे “गो आधारित शेती” अत्यंत सोपी पद्धत, सेंद्रिय शेतीची पद्धत. मात्र यातील वेगळेपण म्हणजे भारतीय गायीचे शेण, गोमूत्र, भारतीय गायीचे तूप, मध आणि विविध वनस्पती की ज्या वनस्पती शेतकऱ्यांच्या गावात अथवा शेतात सहज उपलब्ध होऊ शकतात त्या वनस्पतींचा वापर करून शेती करणे. या पद्धतीत कोंबडी खत, मासोळी खत, गांडूळ खत किंवा इतर कुठल्याही खतांचा वापर केला जात नाही. मूळ उद्देश हाच आहे की शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतीसाठी बाहेरून कुठलीही गोष्ट खरेदी करून आणायची नाही. म्हणजे शेतीसाठी सर्व आवश्यक गोष्टी स्वतःच्या घरात स्वतःच तयार करायच्या आणि वापरायच्या. म्हणजे शेतकऱ्याला कुठला खर्च नको आणि कोणी शेतकऱ्याला फसवायला नको.

अजून एक महत्वाचे म्हणजे सर्व ठिकाणचे शेतकरी सेंद्रिय शेती करण्यास लगेच तयार होत नाहीत कारण त्यांच्या मनात भय घर करून आहे की गो आधारित शेती किंवा सेंद्रिय शेतीमध्ये उत्पादन कमी होते. हा खूप मोठा गैरसमज सर्व शेतकऱ्यांच्या मनातील भय जाऊ देत नाही. वास्तविक पाहता असे काहीच होत नाही. “गो आधारित शेती” तंत्राने जेवढे रासायनिक शेतीतून उत्पादन मिळते तेवढे तर येतेच परंतु ते हळू हळू वाढत देखील जाते.

पहिली गोष्ट म्हणजे गेल्या ६० वर्षांपासून दुर्दैवाने गायींकडे बघण्याचा दृष्टिकोन शेतकरी समाजाचा बदलला, गाय आणि दूध हे समीकरण तयार झाले जर्सी आणि होल्स्टाईन या युरोपियन प्राण्यांना महत्व आले आणि ज्या गायीला तिच्या मनुष्य समाजावर उपकार करण्याच्या अत्यंत उत्तम गुणांमुळे मातेचे स्थान दिले गेले आहे तिलाच घरातील गाय परवडत नाही, खायला काळ आणि भुईला भार असे शेतकरी म्हणायला लागले. परंतु पूर्वीचे शेती आणि भारतीय गाय हे समीकरण पुन्हा आम्ही समाजापुढे आणले आहे की ज्या गोष्टीला आता पर्यायच नाही.

“गो आधारित शेती” म्हणजे भारतीय गायीचा वापर करून शेती करणे. खरेतर एक भारतीय गाय शेतकऱ्याला सांभाळायला काहीच खर्च येत नाही आणि ती आजारी पाडण्याचे प्रमाण अत्यंत कमी असते जेणे करून तिच्या आजारपणासाठी खर्च देखील नगण्य असतो. एक गाय दिवसातून साधारण १२ ते १४ किलो गोमय देते आणि कमीतकमी ३ लिटर गोमूत्र देते. एक भारतीय गाय दिवसाला १ ते ३ लिटर दूध देते असे धरले तर कमीत कमी १ ते ३ किलो तूप शेतकऱ्याच्या घरात तयार होते. शिवाय अधे मधे शेतीला वापरायला लागणारे ताक आणि कच्चे दूध हे देखील या गायीपासून मिळते.

या सर्व गोष्टी शेतकऱ्याला घरातच उपलब्ध होत असल्याने याचा वापर शेतीत केल्यास शेतकऱ्याला कुठलाच खर्च करावा लागणार नाही. अर्थातच त्याचा उत्पादन खर्च एकदम कमी होतो. एक गाय जवळ जवळ १० ते १५ एकर जमीन अत्यंत सुपीक करते. कुठल्याही शेतकऱ्याला साधारणपणे एका एकराला वार्षिक अंदाजे २० ते ३० हजार रुपये एवढा खर्च रासायनिक खते, किट नाशके, तण नाशके याचा येत असेल तर. “गो आधारित शेती” तंत्राचा वापर केल्यास हाच खर्च रासायनिक कुठलीही गोष्ट न वापल्यास २००० ते ३५०० एवढाच येतो.

या सगळ्याचा विचार केल्यास ज्याच्याकडे एकंदरीत १० एकर जमीन असेल त्याचा २ लाख ते ३ लाख येणारा रासायनिक खतांचा खर्च एकदम २० ते ३० हजारांवर येणार म्हणजे विचार करा एक भारतीय गाय सांभाळायचा खर्च जर रु १५०० धरला तर वार्षिक १८००० झाला. म्हणजे २ लाखातून ४०,००० वजा केला तरी देखील निव्वळ बचत १,६०,००० ते २,५०,००० एवढी निश्चित होते. म्हणजे इथेच फायद्यात वाढ झाली.

हे सर्व नुसते कागदावरील आकडे नसून कोणीही शेतकरी हे करू शकतो. भरपूर नफा कमवू शकतो. फक्त मानसिकता बदलण्याची गरज आहे, काम सुरु करण्याची गरज आहे. ज्याच्याकडे जमीन आहे त्याच्या मुलांना कुठेही नोकरी पाहण्याची गरज नाही किंवा टोकाचा विचार करून आत्महत्या करून घेण्याची जरूर नाही. “गो आधारित शेती” तंत्राने कुठलाही शेतकरी स्वयंपूर्ण होईल यात तिळमात्र शंका नाही.

गो आधारित शेती करण्यामागे भरपूर फायदे आहेत.

शेतकऱ्याचे फायदे :
१) रासायनिक शेतीच्या तुलनेत खतांचा, कीटनाशकांचा खर्च १०० % वरून १० ते २० % टक्क्यावर येतो
२) खते आणि कीटकनाशके बाहेरून आणावे लागत नाही म्हणून कोणी फसविण्याचा प्रश्न नाही
३) पाणी कमी लागते
४) जमिनीची प्रत चांगली होते
५) हवेचे प्रदूषण होत नाही
६) कीटकनाशके फवारणीतून विषबाधा होत नाही.
७) शेतकऱ्याचे स्वताचे आरोग्य चांगले रहाते.
८) शेतकऱ्याचे कुटुंबाचे आणि जनावरांचे आरोग्य चांगले रहाते.
९) सर्व उत्पादन सेंद्रिय म्हणजे विषमुक्त होते.
१०) उत्पादन वाढत जाते.
११) उत्पादन खर्च कमी झाल्याने आणि उत्पादन वाढल्याने नफा वाढतो.
१२) शेतकरी स्वयंपूर्ण होतो.
१३) शेतीची अत्यंत सोपी पद्धत

गावाचे फायदे :
१) गावातील शेतकरी स्वयंपूर्ण होतील.
२) गावातील पैसा गावातच राहील.
३) निसर्गपूरक शेती पद्धती असल्याने गावातील वातावरण शुद्ध राहील.
४) विषमुक्त अन्न खाल्ल्याने उत्पादन क्षमता चांगली होईल.
६) आजारपणावरील खर्च कमी होईल.
७) गाव श्रीमंत आणि स्वयंपूर्ण बनेल.

देशाचे फायदे :
१) खते इम्पोर्ट करण्याचा खर्च कमी होईल / संपेल.
२) जीवनसत्वपूर्ण अण्णा धान्याची उपलब्धी देशातच होईल
३) सशक्त मनुष्यबळ निर्माण होईल
४) आरोग्यावरील खर्च देशाचा वाचेल
५) जमीन,हवा,पाणी यांचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर कमी होईल त्यासाठी केला जाणार खर्च कमी होईल
६) विविध कर्जे, आणि सबसिडी यावरील केला जाणारा खर्च वाचेल
७) बऱ्याच उत्पादनात देश स्वावलंबी होईल