गाय आणि वेद पुराण

वेदांमध्ये उत्तम गोवंश वृद्धीचा विचार अतिशय खोलवर केला गेला आहे. गायीचा देह प्रत्येक जीवास उपकारक आहे. गाईची महती वैज्ञानिक पद्धतीने विश्लेषण करून सर्वसामान्यास सहज कळणार नाही म्हणून गाईला ‘आई’ ही संज्ञा दिली. गो हत्येने सात्विकता नष्ट होत जाते, अनाचार माजतो, उत्तम समाजाची वृद्धी खुंटते.

आ गावो अग्मन्नुत भद्रकम्रन् सीदंतु गोष्मेरणयंत्वस्मे ।
प्रजावतीः पुरुरूपा इहस्स्युरिंद्राय पूर्वीरुष्सोदुहानाः ॥
यूयं गावो मे दयथा कृशं चिदश्रीरं चित्कृणुथा सुप्रतीकम् ।
भद्र गृहं कृणुथ भद्रवाचो बृहद्वो वय उच्यते सभासु ॥
(अथर्ववेद ४-२१-११ आणि ६)
“हे गाईंनो! तुमच्या दूध आणि तुपाने तुम्ही शारीरिकदृष्ट्या दुर्बलांना बलवान बनवता आणि आजारी व्यक्तींचे पोषण करून त्यांना उत्तम आरोग्य प्रदान करता. तुमच्या पवित्र स्वरांनी (हंबरण्याने) तुम्ही आमची घरे चैतन्यमय आणि शिस्तबद्ध करता. तुमच्या गौरवाची चर्चा सभा-संमेलनांमध्ये केली जाते.”

आ गावो अग्मन्नुत भद्रकम्रन् सीदंतु गोष्मेरणयंत्वस्मे ।
प्रजावतीः पुरुरूपा इहस्स्युरिंद्राय पूर्वीरुष्सोदुहानाः ॥
यूयं गावो मे दयथा कृशं चिदश्रीरं चित्कृणुथा सुप्रतीकम् ।
भद्र गृहं कृणुथ भद्रवाचो बृहद्वो वय उच्यते सभासु ॥
(अथर्ववेद ४-२१-११ आणि ६)
“हे गाईंनो ! तुमच्या दूध आणि तुपाने तुम्ही शारीरिकदृष्ट्या दुर्बलांना बलवान बनवता आणि आजारी व्यक्तींचे पोषण करून त्यांना उत्तम आरोग्य प्रदान करता. तुमच्या पवित्र स्वरांनी तुम्ही आमची घरे पावन करता. तुमच्या गौरवाची चर्चा सभा-संमेलनांमध्ये (मोठ्या जनसमुदायात) केली जाते.”

वशां देवा उपजीवंति वशां मनुष्या उप ।
वशेदं सर्वं भवतु यावतु सूर्यो विपश्यति ॥
“देव आणि मानव हे गायीच्या उत्पादनांवर (दूध, तूप इ.) अवलंबून आहेत. जोपर्यंत सूर्य प्रकाशमान राहील, तोपर्यंत या विश्वात गायींचे अस्तित्व असेल. हे संपूर्ण विश्व गायींच्या आधारावरच टिकून आहे.”
(अथर्ववेद 10-10-34)

सा नो मंद्रेषमूर्जम् दुहाना ।
धेनुर्वा गस्मानुष सुष्टुतैतु ॥
“ती कामधेनु आहे – आपल्या सर्व इच्छा पूर्ण करणारी दिव्य गाय. तिचे शरीर गाईचे आहे आणि मुख स्त्रीचे आहे. समुद्रमंथनाच्या वेळी अमृताच्या आधी तिचा जन्म झाला. तिच्या केसांतून सुगंध दरवळतो. ती आपल्या सडातून (स्तनांतून) धर्म, अर्थ, काम आणि मोक्षाचा वर्षाव करते. ती आत्मज्ञान, आश्रय, सूर्य, चंद्र आणि अग्निदेवाचे निवासस्थान आहे. सर्व देव आणि सजीव प्राणी तिच्यावर अवलंबून आहेत. आपण अल्प प्रार्थना केली तरी ती आपल्याला अन्न आणि परम ज्ञान प्रदान करते. ती सदैव आपल्या समीप असो.”
कठोपनिषदातील गायी – विश्वजित यज्ञादरम्यान नचिकेत ऋषी वाजश्रवस यांना म्हणतो…
पीतोदका जग्धतृणा दुग्धदेहा निरिंद्रियाः ।
आनंदा नाम तेलोकस्तान् स गच्चति ता ददत् ॥
(कठोपनिषद – विश्वजित यज्ञादरम्यान नचिकेत ऋषी वाजश्रवस यांना म्हणतो) “या गाईंनी आपले गवत खाऊन पूर्ण केले आहे आणि पाणीही पिऊन झाले आहे. त्यांचे दूध काढून झाले आहे आणि आता त्या प्रजननक्षम राहिलेल्या नाहीत (म्हणजेच त्या आता म्हाताऱ्या आणि अशक्त झाल्या आहेत). जो कोणी अशा वृद्ध गाईंचे दान करतो, तो आनंद विरहित अशा अंधकारमय लोकांत (नरकात) जातो. त्याऐवजी, तुम्ही माझे दान करा.”
महाभारतातील गायी, अनुशासन पर्व…

गोकुलस्य तृषार्तस्य जलार्थे वसुधाधिपः ।
उत्पादयति यो विघ्नं तं विद्याद्ब्रह्मघातिनम् ॥
“तहानलेल्या गाईंना पाणी पिण्यापासून रोखणे किंवा त्यांच्या पाण्याच्या मार्गात अडथळा निर्माण करणे, हे ब्रह्महत्येसारख्या (ब्राम्हणाची हत्या करणे) महापापाच्या समान मानले जाते.” (महाभारत, अनुशासन पर्व २४-७)

गवां मूत्रपुरीषस्य नोद्विजेत कथंचन ।
न चासां मांसमश्नीयाद्गवां पुष्टिं तथाप्नुयात् ॥
“गोमूत्र और गोबर का सेवन करने में संकोच न करें – क्योंकि वे परम पवित्र हैं। लेकिन मनुष्य को कभी भी गाय के मांस का भक्षण नहीं करना चाहिए। ‘पंचगव्य’ का सेवन करने से व्यक्ति अधिक बलवान और शक्तिशाली बनता है।” (महाभारत, अनुशासन पर्व ७८-१७)

गावो ममाग्रतो नित्यं गावः पृष्ठत एव च ।
गावो मे सर्वतश्चैव गवां मध्ये वसाह्यहम् ॥
“माझ्या समोर गाई असाव्यात, माझ्या मागे गाई असाव्यात आणि माझ्या चोहोबाजूंना गाई असाव्यात. मी गाईंच्याच सानिध्यात (त्यांच्यामध्ये) निवास करतो.” (महाभारत, अनुशासन पर्व ८०-३)

दानानामपि सर्वेषां गवां दानं प्रशस्यते ।
गावः श्रेष्ठाः पवित्राश्च पावनं ह्येतदुत्तमम् ॥
“गायींचे दान हे इतर सर्व प्रकारच्या दानांपेक्षा श्रेष्ठ आहे. गायी सर्वोच्च आणि परम पवित्र आहेत.” (महाभारत, अनुशासन पर्व ८३-३)

प्राचीन भारतीय संस्कृतीत ‘गौ-दान’ हे केवळ धार्मिक कर्मकांड नसून ते सामाजिक आणि आर्थिक संपन्नतेचे प्रतीक मानले गेले आहे. अनुशासन पर्वात भीष्म पितामह सांगतात की, एका सत्पात्री व्यक्तीला गाय दान केल्याने दात्याला आध्यात्मिक मुक्ती आणि जीवनात समृद्धी प्राप्त होते.

सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदनः ।
पार्थो वत्सः सुधीर्भोक्तादुग्धं गीतामृतः महत् ॥
“भगवद्गीता हे उपनिषदांचे सार आहे. ती एका गाईसारखी आहे जिचे स्वतः श्रीकृष्ण दूध काढत आहेत. अर्जुन हा त्यातील वासरासारखा आहे, तर विद्वान भक्त भगवद्गीतेच्या या अमृतमयी दुधाचे प्राशन करत आहेत.”
हे वर्णन ‘गीता ध्यानम्’ मधील एका अतिशय प्रसिद्ध श्लोकावर आधारित आहे:
सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः | पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् ||
अर्थ: सर्व उपनिषदे ही गाई आहेत, त्यांचे दूध काढणारे स्वतः श्रीकृष्ण आहेत, अर्जुन हा वासरू आहे, ज्याच्या निमित्ताने हे दूध (ज्ञान) मिळाले आणि शुद्ध बुद्धीचे लोक या गीता-रूपी महान अमृताचे भोक्ते (प्राशन करणारे) आहेत.

गौर्मे माता वृषभः पिता मे दिवं शर्म जगते मे प्रतिष्ठा ।
“गाय ही माझी माता आहे आणि बैल हा माझा पिता आहे. या जोडीने मला या लोकात सुख आणि परलोकात (स्वर्गात) परमानंद प्रदान करावा. मी माझ्या जीवनासाठी गाईवर अवलंबून आहे – असे म्हणून मनुष्याने गाईला शरण जावे.”

पद्मपुराणातील गायी…
पद्मपुराणात गायीला ‘सर्वदेवमयी’ मानले गेले आहे. या श्लोकाचा मूळ भाव असा आहे की, गाय केवळ दूध देत नाही तर ती संपूर्ण सृष्टीच्या कल्याणाचे आणि आध्यात्मिक प्रगतीचे प्रतीक आहे. बैल हा शेती आणि श्रमाचे प्रतीक असल्याने त्याला पित्याचा दर्जा दिला गेला आहे.
गावो बंधुर्मनुष्याणां मनुष्याबांधवा गवाम् ।
गौः यस्मिन् गृहेनास्ति तद्बंधुरहितं गृहम् ॥
“गाई या धनदेवतेचे (लक्ष्मीचे) निवासस्थान आहेत. पाप त्यांना स्पर्श करू शकत नाही. मनुष्य आणि गाय यांच्यामध्ये एक अत्यंत जिव्हाळ्याचे आणि श्रेष्ठ नाते आहे. गाईशिवाय असलेले घर हे प्रिय व्यक्तींशिवाय असलेल्या घरासारखे (पोरके) असते.” पद्मपुराण

गाईच्या उत्पत्तीची कथा शतपथ ब्राह्मण ग्रंथात पुढीलप्रमाणे सांगितली आहे. दक्ष प्रजापतीने प्राणिसृष्टी निर्माण केल्यानंतर थोडे अमृत प्राशन केले. त्या अमृताने तो संतुष्ट झाला. त्यावेळी त्याच्या नाकातून जो श्वास बाहेर पडला. त्याचा सुगंध सर्वत्र दरवळला. त्या श्वासातून एक गाय जन्मास आली. सुंगधातून जन्मल्यामुळे दक्ष प्रजापतीने तिचे सुरभी असे नाव ठेवले. सुरभीपासून अनेक गायी जन्मास आल्या. त्यामुळे सुरभी ही संपूर्ण गोवंशाची माता, जननी ठरली.

सुरभीने एकदा तप आरंभिला. ब्रह्मदेव त्या तपाने प्रसन्न झाला. त्याने सुरभीला अमरत्व प्रदान केले. तसेच त्रैलोक्याच्या वर असलेला एक स्वर्गही तिला बहाल केला; जो स्वर्ग गोलोक या नावाने ओळखला जातो. सुरभी या गोलोकात नित्य निवास करते आणि तिच्या कन्या, सुकन्या भूलोकात पृथ्वीवर राहतात. या गोलोकाचा अधिपती गोविंद अर्थात भगवान श्रीकृष्ण हा आहे. सूरभी एकदा इंद्रदेवाच्या दारावर भगवान श्रीकृष्णाच्या भेटीला गेली आणि पशुराज्याच्या विषयांची श्रीकृष्णाची सदिच्छा पाहून तिने त्यांना आपल्या गोलोकाचा इंद्र म्हणून निवडले. भगवान श्रीकृष्णाचे गोप्रेम सर्वत्र प्रसिद्धच आहे.

सर्वे देवा गवामङ्गे तीर्थानि तत्पदेषु च | तद्गुह्येषु स्वयं लक्ष्मी स्तिष्ठ्त्येव सदा पित: ||
गोष्पदाक्तमृदा यो हि तिलकं कुरुते नर:| तीर्थस्नातो भवेत सद्यो जयस्तस्य पदे पदे ||
गावस्तिष्ठन्ति यत्रैव ततीर्थं परिकीर्तितम | प्राणांस्त्यक्त्वा नरस्तत्र सद्यो मुक्तो भवेद ध्रुवम ||

गाईच्या शरीरात सर्व देवगण निवास करतात आणि गाईच्या पायात तीर्थ निवास करतात. गाईच्या गुह्य भागात नेहेमी लक्ष्मी निवास करते. गोधुलीस जो मनुष्य आपल्या कपाळावर धारण करतो तो तत्काळ तीर्थ स्नान केल्याचे पुण्य प्राप्त करतो आणि त्याचा पावलो पावली विजय होतो. जेथे गायींचा निवास असतो त्या स्थानाला तीर्थ भूमीचे स्वरूप प्राप्त होते. अशा भूमीत ज्या मनुष्याचा मृत्यू होतो तो तत्काळ मुक्त होतो हे निश्चित.

गोमाता ही रुद्रांची माता, वसुंची मुलगी, अदितीपुत्रांची बहीण आणि घृतरूप अमृताचा खजिना आहे. गोमाता ही पुष्टीची कारण व लक्ष्मीचे मूळ आहे. गोमातेसाठी देणाऱ्याचे पुण्य कधी नष्ट होत नाही. गोमाता सर्वोत्तम प्राप्तीचे कारण आहे. गोमाता समस्त प्राण्यांचा आधार आहे.

अन्नं हि परमं गावो देवानां परमं हवि: | स्वाहाकार वषटकारौ गोषु नित्यं प्रतिष्ठितौ.||

गायच सर्वोत्तम अन्नाच्या प्राप्तीचे कारण आहे. तीच देवांना उत्तम हविष्य प्रदान करते. देव यज्ञ व इंद्र यागादी कर्म नेहेमी गो मातेवरच अवलंबून आहेत.

गोमातेचे दर्शन व नमस्कार करून तिची परिक्रमा करावी. असे केल्याने सप्तद्वीपांच्या सहित संपूर्ण भूमंडलाची प्रदक्षिणा होते. गोमाता समस्त प्राण्यांची माता असून सर्व सुख देणारी आहे. वृद्धीची आकांक्षा करणाऱ्याने नित्य गो प्रदक्षिणा करावी. जलाधिनाथ वरुणाचा पुत्र, पुष्कर द्विपाचा स्वामी व सर्वशास्त्र ज्ञाता पुष्कर यांनी भगवान परशुरामांच्या विचारण्यावरून त्यांना गोमती विद्येचा उपदेश केला. समुद्र मंथनाच्या वेळी क्षीरसागरातून पाच लोकातील नंदा, सुभद्रा, सुरभी, सुशीला, बहुला या मातृस्वरुपा कल्याणकारिणी पाच गायी उत्पन्न झाल्या. ह्या पाच गायी लोक कल्याणा साठी तसेच देवांना हविष्या द्वारे तृप्त करण्यासाठी आविर्भूत झाल्या. देवांनी त्यांना महर्षी जमदग्नी, भरद्वाज, वसिष्ठ, असित व गौतम मुनींना समर्पित केले. या सर्व जणी सर्व कामना पूर्ण करणाऱ्या कामधेनु म्हणून जाणल्या गेल्या. त्यांच्या पासून दूध, दही, तूप, गोमय, गोमूत्र, गोरोचन ही सहा द्रव्ये म्हणजे गोषडंग प्राप्त होतात. ही गोषडंग अत्यंत पवित्र व समस्त पापांचा नाश करणारी व शुद्धता प्रदान करणारी आहेत.

पृथ्वी वरील सर्व पवित्र पदार्थ, मिष्टान्न आहार हे गोदुग्धा पासूनच बनतात. ब्राह्मण व गाय एकाच कुळातून उत्पन्न झाले त्यामुळे ते दोघे वेगळे नसून एकाच कुळाचे दोन पैलू आहेत. ब्राह्मणात मंत्रांचा निवास आहे व गायीत हविष्याचा. या दोन्हींच्या संयोगाने विष्णुरूप यज्ञ संपन्न होतात. शिक्षा, कल्प, निरुक्त, व्याकरण, छंद, ज्योतिष आणि पद, जटा, शिखा, रेखा आदी क्रमाने सर्व वेद गोमातेतच सुप्रतिष्ठित आहेत. भगवंतांच्या मुखातून तेजोमय पुंज प्रकट झाला. त्या तेजापासून सर्व प्रथम वेदांची उत्पत्ती झाली. तत्पश्चात क्रमश: अग्नि, गोमाता, ब्राह्मण हे उत्पन्न झाले, असे पद्मपुराणात ब्रह्मदेवांनी नारदांना सांगितले आहे.

यानि कानिच दुर्गाणि दुष्कृतानि कृतानि च | तरन्ति चैव पाप्मानं धेनुं ये ददति प्रभो ||

प्रभो जे लोक नवप्रसुतिका व दूध देणारी गाय दान करतात ते कुठलेही दुर्गम संकट आले तरी त्या सर्वातून, आपल्या स्वत:च्या केलेल्या दुष्कर्मातून व समस्त पाप संचायातून मुक्त होऊन तरुन जातात.

श्री संपन्न बिल्ववृक्ष गोमया पासूनच उत्पन्न झाला. हा वृक्ष शिवांना अत्यंत प्रिय आहे. कारण या वृक्षात साक्षात पद्महस्ता भगवती लक्ष्मी निवास करते. म्हणूनच या वृक्षाला श्री वृक्षही म्हटले गेले आहे. नीलकमल व रक्तकमलाची बीजेही गोमयातून उत्पन्न झाली. गो गोमातेच्या पोटातून परम पवित्र गोरोचन प्राप्त होते. सर्व देवतांचा आहार गुग्गुळ हे गोमुत्रा पासून उत्पन्न झाले. हे शंकरांना फारच प्रिय आहे.

ब्राह्मतेज संपन्न अशा ऋषींचा एकदा शंकरांकडून काही अपमान झाला. तेव्हा त्या ऋषींनी शंकरांना घोर शाप दिला. त्या शापाच्या भयाने त्रस्त होऊन शंकर गोलोकात गेले आणि तेथे पवित्र ब्राम्हणांचे दुसरे रूप असलेल्या गोमाता सुरभीची त्यांनी स्तुती केली. मग सुरभीची परिक्रमा करून त्यांनी सुरभीच्या देहात प्रवेश केला. सुरभी मातेने त्यांना आपल्या गर्भात धारण केले. इकडे शिवांचे अस्तित्व कोठेच न दिसल्याने सगळीकडे हाहा:कार उडाला. तेव्हा देवांनी त्या ब्राह्मणांचे स्तवन करून त्यांना प्रसन्न केले. तेव्हा त्या पवित्र ब्राह्मणांनी देवांना शिव गोलोकात असल्याचे सांगितले. गोलोकात शिव सुरभिकडून नील नावाच्या वृषभ रुपात अवतीर्ण झाले. ते सुरभीच्या विविध रूपातील कामधेनुं मध्ये क्रीडा करीत होते. मग ब्राह्मणांनी नील वृषभ रूपातील महेश्वरांना वरदान दिले की मृत मनुष्याच्या अकराव्या दिवशी नील वृषभास डाव्या बाजूस चक्र व उजवीकडे शूल अंकित करून गाईंच्या समूहात सोडले तर ते जगत कल्याण करतील आणि देवांचे रक्षण करतील.

वृषभध्वज
एकदा सुरभीचा एक बछडा दूध पित असताना दुधाचा फेस उडून जवळ बसलेल्या शंकरांच्या मस्तकावर उडला तेव्हा त्यांना क्रोध आला. ते पाहून प्रजापातींनी त्यांना सांगितले की “प्रभो हे तर अमृतच आपल्या डोक्यावर उडाले आहे. गोमातेचे दूध ज्यावेळी वासरू पित असते तेव्हा ते कधीच उष्टे होत नाही. जसे वहाणारी नदी पाणी वाहते त्या प्रमाणे रोहिणी गोमाता दूध पाजताना पान्हा सोडते. तसेच वायू, अग्नी, सुवर्ण, समुद्र व देवांनी प्यायलेले अमृत जसे उष्टे नसते तसेच आपल्या वासराला दूध पाजताना गाय दुषित होत नाही”. प्रजापातींनी महादेवांना खूप गायी आणि एक वृषभ दिला. तेव्हा शिवांनी प्रसन्न होऊन वृषभास स्वत:चे वाहन बनविले आणि आपल्या ध्वजास वृषभाच्या चिन्हाने सुशोभित केले म्हणून शंकरांचे नाव ‘वृषभध्वज’ पडले. मग सर्व देवांनी महादेवांना पशुंचे स्वामी ‘पशुपती’ बनविले आणि गायींच्या मध्ये त्यांचे नाव ‘वृषभांक’ ठेवले.

राजा दशरथ
स्वयंभू ब्रह्मांनी लोक सृष्टीची जेव्हा इच्छा केली तेव्हा त्यांनी समस्त प्राण्यांच्या जीवन वृत्ती साठी पहिल्यांदा गो सृष्टी बनविली. सर्व वैभवाची मूलाधार आणि मातृ शक्तीची साक्षात प्रतिमा गोमाताच आहे. महाराज दशरथ यांना पुत्र प्राप्तीस विलंब होऊ लागला. त्यांचे जीवन शेवटच्या चतुर्थांशात पोहोचले. शेवटी वसिष्ठांच्या सांगण्यावरून शृंगी ऋषींकडून यज्ञ केला गेला व दहा लाख गायी त्यांनी दान केल्या. तेव्हा अग्नी देव स्वत: प्रकट झाले आणि दशरथांच्या राण्यांसाठी पायस सुवर्ण पात्रातून दशरथास दिले. पायस ग्रहणा नंतर सर्व राण्यांपासून सर्व भावांसहीत भगवान श्रीरामांचा जन्म झाला. श्रीरामांना नजर लागू नये म्हणून रोज त्यांच्या अंगास गायीचे तूप लावून त्या तुपाचे तुला दान केले जाई. गो घृतात कुरूपता, पाप, बाधा यांचा नाश करणारे गुणधर्म आहेत. श्री रामांच्या लग्नाच्या वेळी सुवर्ण विभूषित चार लाख गाईंचे दान दिले गेले. राम राज्यात तर गाईंचे रोज पूजन होत असे आणि त्यांची सेवा हा तर राजधर्मच होता. त्यामुळे गायी मनोवांच्छित दूध देत असत.

गोमाता यज्ञाचा आधार आहे. देव,पितर यांच्या पूजेत तिला स्थान आहे. ती देवतांना शक्ती प्रदान करते, मनुष्यानी केलेल्या सेवेने संतुष्ट होऊन भक्ती व मुक्ती प्रदान करते. जीवाचा मनुष्ययोनी मरणोत्तर प्रवासही सुखकर करते. म्हणूनच ती पूजा आणि सेवा करण्यास योग्य आहे. गोमातेस न जाणता तिचे केवळ अर्थार्जनासाठी दूध विकून अनाचाराने पालन करणारे, गो हत्या करणारे व करविणारे, गोमांस खाणारे, केवळ अर्थार्जनासाठी गोविक्रय करणारे कली युगातील राक्षसच आहेत. तिची सेवा न करणारे, तिचा व्यवस्थित सांभाळ न करणारे, तिला मारणारे, तिला अंधारात कोंडून ठेवणारे, तिला उपाशी-तहानलेले ठेवणारे, तिला कधीच खायला प्यायला न घालणारे कली युगातील असुरच आहेत.

तेहेतीस कोटी देव तिच्या शरीरात स्थित आहेत. सात्विक अहंकारच सर्व देवांना एकत्र राहून देत नाही. एकदा सर्वच देव मिळून ब्रह्म देवांकडे गेले आणि त्यांना विचारू लागले की आम्ही सगळेच जण एकत्र राहू शकू असे स्थान आम्हाला सांगावे. तत्काळ त्यांना ब्रह्म देवांनी उत्तर दिले की “तुम्ही सर्व एकाचवेळी एकाच ठिकाणी वास्तव्य करू शकाल असे एकच स्थान आहे. ते म्हणजे ‘गोतनु’ ”. हे ऐकल्यावर सर्वच देवांनी गायी कडे प्रयाण केले आणि तिच्या तेहेतीस कोटी रंन्ध्रा मध्ये स्थापित झाले परंतु श्री लक्ष्मी आणि गंगा या दोघींना तेथे पोहोचण्यास विलंब झाला. सर्वांनी स्थान ग्रहण केलेले असल्याने त्या दोघींना कोठेच जागा उरली नाही. मग शोक उत्पन्न झाल्यामुळे त्या दोघींनी ब्रह्म देवांकडे विनवणी केली की आम्हाला येथे जागा नाही आता आम्हाला तुम्ही स्थान द्या. ब्रह्मदेव म्हणाले तुम्ही आपापल्या स्वलोकात परत जा. त्यावर गोमातेने श्री लक्ष्मीस गोमयात आणि गंगेस गोमुत्रात निवास करण्यास सांगितले.

गोमातेच्याअंगावरून रोज जो हात फिरवितो त्याची दृष्टी सुधारते आणि त्याची हाडे बळकट बनतात. गोसेवेने दधिची या ऋषींची हाडे बळकट बनली व त्यांना ब्रह्मतत्वात निमग्न रहाण्याची कला प्राप्त झाली.

इंद्र आणि बृहस्पती
एक दिवस इंद्र सिंहासनावर बसला असता तेथे देवगुरु बृहस्पती आले. परंतु मदमत्त असल्याने इंद्राचे चित्त थाऱ्यावर नव्हते. त्यामुळे बृहस्पतींकडे ना त्याने पाहिले, ना बृहस्पतींचे स्वागत त्याने केले. म्हणून बृहस्पतींनी देवांचा त्याग केला आणि इंद्राला दरिद्री होशील म्हणून शाप दिला. हा प्रसंग शुभ समजून दैत्यांनी देवांवर आक्रमण करून स्वर्ग जिंकून घेतला. यावर उपाय शोधण्यासाठी सर्व देव ब्रह्मदेवांकडे गेले. ब्रह्मदेवांनी त्यांची कानउघडणी करून प्रजापती त्वष्टाचा ब्रह्मनिष्ठ असलेला पुत्र विश्वरूप याचेकडे पाठविले. विश्वरूपाने देवांना नारायण कवच प्रदान केले. त्याच्या बळावर देवांना पुन्हा स्वर्ग प्राप्ती झाली. विश्वरूपाची ब्रह्मनिष्ठा एवढी सिद्ध झाली होती की राक्षसांच्या मध्ये सुद्धा त्याला परब्रह्म दिसे. विश्वरूपाचे मातृगृह असुर कुळातील असल्याने विश्वरूप देवांनी केलेल्या यज्ञातील यज्ञभाग चोरून असुरांनाही देई. म्हणून इंद्राने त्याचे डोके छाटून गुरु हत्या केली. प्रजापती त्वष्टाला यामुळे खूप दुःख झाले व त्याने इंद्रास मारणारा पुत्र व्हावा म्हणून यज्ञ केला. या यज्ञात आहुतीसाठी “इन्द्रशत्रो विवर्धस्व” हा मंत्र ऋत्विजांनी चुकून इन्द्र शब्दाला उदात्त आणि शत्रो शब्दाला अनुदात्त करून म्हटले. या चुकीचा परिणाम म्हणून इंद्राकडूनच मारला जाईल असा ताकदवर वृत्रासुराचा जन्म झाला. वृत्रासुराने देवांना हैराण करून सोडले. त्यावेळी परमात्म्याने देवांना सांगितले की दधीचि ऋषींच्या अस्थि घेऊन वज्र बनविता आले तर त्या वज्राने वृत्रासुराचा अंत होऊ शकेल. हे दधिची ऋषी नित्य गोसेवा करत आणि गो सन्निध असत त्यामुळे त्यांची हाडे लोहापेक्षा कणखर बनली होती व ते कायम ब्रह्म तत्वात निमग्न रहात. दधिची यांनी इंद्राच्या विनंती वरून आपली हाडे देहासकट इंद्रास सुपूर्त केली. इंद्राने त्यापासून वज्र बनविले आणि परमात्म्याने त्या वज्रात आपले तेज ठेवले मग त्याच्या प्रघाताने वृत्रासुराचा अंत झाला.

गोमाता ही ममता, दया, क्षमा, शांती, विनम्रता, सहनशीलता या गुणधर्मांनी युक्त असणारी, सर्वदेव शक्ती एकत्र करणारी, अहंकार नष्ट करणारी माता आहे. म्हणूनच कलीयुगातील राक्षसी गुण संपन्न मनुष्य तिची हत्या करू लागले. सत्य युगात मनुष्याची दृष्टी मुक्तीवर होती, त्रेता युगात धर्म आणि कर्मावर होती, द्वापार युगात कामनेवर होती. तर कलीयुगात अर्थावर आहे. सर्वच जण जाणतात की गोमाता ही धर्माचे मूळ आहे. परंतु कलीयुगातील लोक तिचा सन्मान करीत नाहीत. त्यांना अर्थ प्राप्ती आणि कामनेची पूर्ती या विषयांपुढे धर्म व मोक्ष या पुरुषार्थांचा विचार सुद्धा करण्याची इच्छा व वेळ होत नाही.

गायी पासून उत्पन्न झालेला नंदी कृषी करून भू मातेची भरभराट करून देतो. अन्नाचे उत्पादन करून समस्त प्राणी मात्रांची क्षुधा निवारण करतो. ज्या शेतात बैलांच्या सहाय्यानी नांगरणी केली जाते त्या शेतात उत्पन्न झालेल्या अन्नानीच प्राणी मात्रांना क्षुधा निवारणा बरोबर संतोष आणि सात्विकता प्राप्त होते. मशिन वापरून केलेल्या शेतातील धान्याने नुसतीच क्षुधा निवारण होते परंतु त्यातून तृप्ती, संतोष, सत्व प्राप्त होत नाही. ज्या घराला गोमयाने सारविले जाते तेथे देवलोकातील देव न बोलावताच येतात त्यामुळे अशा घरात अन्न धान्याची कमतरता न होता तृप्ती, संतोष प्राप्त होतो. समाधान मिळून मनात हळू हळू दिव्य भावना जागृत होऊन विचारांना विशालता प्राप्त होते. गोमातेच्या संतुष्टीने ती वरदान देते त्यामुळे सुख संपदा प्राप्त होते. जेथे गोमय लेपन होते तेथे शरीर पीडा संपते. चर्म रोग, व्याधी संपून शरीर निरोगी बनते. गाईच्या सान्निध्यात राहिल्याने स्वभाव सरलता, निरागसता प्राप्त होते, दुखः, दारिद्र्य नष्ट होते.

गाईच्या शिंगां खाली विशिष्ठ प्रकारच्या ग्रंथी असतात त्या ग्रंथी एक प्रकारचा द्राव बनवितात. गाईच्या शिंगांपासून पाठीवरून शेपटीच्या शेवट पर्यंत सुवर्ण केशा किंवा सुवर्ण केतू नावाची नाडी आहे. त्यातून हा द्राव वहात असतो की जो सूर्य किरणांपासून विविध प्रकारची शक्ती ग्रहण करतो व त्याचा रंग पिवळा बनतो. या नाडी पासून तिच्या आचळा पर्यंत उपनाड्या जातात त्यातून ती शक्ती त्या पिवळ्या रंगाच्या द्रावामार्फत दुधात उतरते व ती शक्ती दूध पिणाऱ्यास प्राप्त होते.

दिलीप राजा
एकदा मिथिलापती जनकाने त्याच्या वाटेतील चरणाऱ्या गाईस बाजूला केले तर त्याला नरकाचे दर्शन घ्यावे लागले. जेथे गोमातेचे अश्रू ढळतात तेथे भूमी नापीक होऊ लागते. जेथे तिची हत्या केली जाते तेथील प्रजा शापग्रस्त होऊन राजा व चोर यांच्याकडून नाडली जाते, त्रासली जाते. तेथे असंतोष, अशांतता निर्माण होते, अस्थिरता येऊन अन्नातील सत्व कमी होते. मनुष्य जीवन रोगी व बलहीन बनते. सत्यवाद, निर्लोभता, दान वृत्ती नष्ट होऊन आचार भ्रष्टता येते व वैचारिक पातळी हीन दर्जाची बनते.

सूर्यवंशी अवध नरेश दिलीप याने एक दिवस गुरुदेव वसिष्ठ यांचेकडे स्वत:ला पुत्र प्राप्ती न होण्याचे कारण विचारले. वसिष्ठांनी दिव्यदृष्टीने पाहून राजा दिलीप यास सांगितले “हे राजा तू ज्यावेळी देवलोकास भेट देऊन स्वर्गातून येत असताना वाटेत कामधेनु गाय उभी होती तिला नमस्कार तर केला नाहीसच परंतु तिला उजवीकडून ओलांडून तिचे दर्शन न घेता पुढे निघून आलास. त्यामुळे तुला पुत्र प्राप्ती होत नाही. या वरचा उपाय म्हणून तू तिची मुलगी नंदिनी जी माझ्याकडे आहे तिची सेवा कर.” मग राजा दिलीप आणि राणी सुदक्षिणा या दोघांनी नंदिनीची सेवा करावयाचे ठरवून नंदिनी धेनूची प्रतिछाया बनून तिच्या बरोबर तिची सेवा करत करत अवध नगरीकडे निघाले. नंदिनीने राणी सुदक्षिणाला अक्षय पात्र प्रदान केले. रोज नंदिनीची सेवा, पूजा करत करत पुत्र प्राप्तीची कामना ठेवून सुदक्षिणा दिवस घालवत असे. नंदिनीने एक दिवस यांची परीक्षा घेण्याच्या हेतूने चरता चरता वाटेतील डोंगराच्या एका गुहेत गेली व स्वमायेने सिंह प्रकट केला. तो सिंह नंदिनीस शिकार बनविण्याच्या हेतूने चाल करण्यास सज्ज झाला. ह्या सिंहास पाहून राजाने स्वत:चा धनुष्य सरसावला. हे पाहून सिंह मनुष्य वाणीत बोलू लागला, राजास म्हणाला “हे राजन मला तर गो हत्येचा दोष नाही कारण तो तर माझा आहारच आहे आणि तू मला माझा आहार घेण्यापासून का वंचित करतोस ? हो आणि तू तसाही करण्याचा प्रयत्न केलास तरी देखील मला काहीच हानी पोहोचवू शकणार नाहीस कारण मी या जंगलाचा राजा आहे.” यावर राजा उत्तरला “तू त्या गायीला सोड माझा बळी घे मला तुझे भक्ष्य बनव.” सिंह म्हणाला “ अरे तू तर बावळट दिसतोस. या गायीपेक्षा पुष्ट, सुंदर अशा भरपूर गायी तुझ्याकडे असतील. ही एक गाय गेली तर तुला काय एवढे ? ” यावर विनम्रतेने राजा उत्तरला “हे सिंह राज क्षत्रियांचा पृथ्वी वरील जन्मच केवळ गो रक्षणाकरिता असल्याने माझ्याकरिता स्वप्राण आणि राज्य यांचे महत्व गोरक्षणापेक्षा जास्त नाही. त्यामुळे समस्त नश्वर गोष्टींना वमन केलेली घाण समजून त्याग करण्यास मी समर्थ आहे. तेव्हा हे माझे शरीर तुझ्या सुपूर्त केले आहे. हे तू आता ग्रहण करावेस व त्या गोमातेस सोडून द्यावे ही विनंती.” हे एकून नंदिनी प्रसन्न झाली आणि मायेने धारण केलेलं सिंहरूप अंतर्धान झाले. नंदिनी म्हणाली “हे राजन तुझी गुरुभक्ती आणि गोमातेप्रती असलेला दयाभाव पाहून मी प्रसन्न झाले. मी तुझी परीक्षा पाहण्यासाठी हे दृश्य तयार केले. तू मला नुसती दूध देणारी गाय समजू नकोस. मी तुला वरदान देते की समस्त कामनापूर्ती करणारी सिद्ध कामधेनु म्हणून मी तुला प्राप्त आहे.” राजाने नंदिनीच्या पायावर लोळण घातली. “एक वर्षाच्या आत पुत्र प्राप्ती होईल व त्या पुत्राचे नाव रघु असेल, समस्त भूतलावर त्याची कीर्ती राहील. त्याच्या वंशाचीही कीर्ती त्याच्या नावानेच वृद्धिंगत होईल.” असा आशीर्वाद नंदिनीने दिलीप राजाला दिला. पुढे याच वंशात प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला.

जेव्हा गाईंचे संरक्षण होते तोपर्यंत धर्म आणि सत्ता एकत्र नांदतात. आता सत्तेपासून धर्म निराळा झाला आहे. गोसंरक्षण जो पर्यंत होते तो पर्यंत समाज व गोवंश सबल, बुद्धिवान व सत्वगुण संपन्न होता. राज्यनिती वर जर धर्माचा अंकुश असेल तरच राष्ट्र व समाज पुष्ट होतो व आचारभ्रष्ट न होता मानसिकतेने, शरीराने संतुलित रहातो.

नामदेव महाराज
नामदेव महाराज भारत भ्रमण करताना दिल्लीला पोहोचले. त्यांच्या नित्य नियमा प्रमाणे ते दररोज जेथे थांबतील तेथे कीर्तन करत असत. कीर्तनातून देव भक्तिचे महात्म्य सांगत असत. बादशहाला दिल्लीत नामदेव महाराज पोहोचल्याचे कळले म्हणून दुर्हेतुने काही सैनिक बरोबर घेऊन नामदेव महाराज जेथे कीर्तन करत होते तेथे आला. नेमका विषय असा होता की “पंढरीनाथ गोपालकृष्ण जेथे गायी असतील तेथे नक्कीच येतात त्यांच्या जवळच ते राहतात असे त्यांचे वचन आहे.” बादशाहने मोठयाने ओरडून त्यांना कीर्तन बंद करायला लावले. म्हणाला “आता तुझा देव कुठे असतो ते दाखव, या गायीला तू कसे वाचवू शकतोस ते बघू” आणि जवळच उभ्या असलेल्या गाईच्या मानेवर स्वत:च्या हातातील तलवारीने त्याने आघात केला. बिचारी गाय तडफडू लागली. नामदेव महाराजांचा स्वभाव एवढा सरळ होता की हे पाहून त्यांना अतीव दु:ख झाले आणि ते स्तंभित झाले. काही क्षणात त्यांना रडू कोसळले पण स्वत:ला आवरून आर्त स्वरात भगवान श्रीकृष्णाला आळवू लागले. “ हे नाथ मी तर आयुष्य भर तू सांगशील तसा वागलो आणि बोललो. आता तर आपल्या मातेवरच या नराधमाने घाला घातला तूच यातून तिला वाचव.” पुढच्या काही क्षणातच चमत्कार घडला एक मनुष्य धावत तेथे आला त्याने गाईच्या मानेवर जेथे बादशहाने घाव घातला होता तेथे त्याने हात फिरविला आणि गायीला जिवंत केले. बादशहाने नामदेवांच्या पायावर लोळण घेतली आणि म्हणाला “आप जैसा फकीर मैने आज तक नही देखा !”

एकटया नंदाकडे नऊ लाख गायी होत्या. श्रीकृष्ण व्रजामध्ये अनवाणीच फिरत. एकदा यशोदा श्रीकृष्णास म्हणाली “अनवाणी फिरण्याने पायाला काटे, दगड धोंडे बोचतील तेव्हा तू खडावा घालून जा ”. श्रीकृष्ण म्हणाले “गायींची सेवा करण्याकरिताच मी तुमच्या येथे आलो. गायींच्या पायातही जर काही नाही तर मी कशा खडावा घालू ? गेल्या जन्मात मी राजा दशरथाच्या घरी राम म्हणून आलो तर मला गायींची सेवा करण्याची संधी कोणी दिलीच नाही. म्हणून मी ठरविले होते की भविष्यात मी एखाद्या गोपाळाच्या येथेच जन्म घेईन आणि गो सेवा करेन.” श्रीकृष्ण जेव्हा पाच वर्षांचे होते तेव्हा पासून ते गायीला खाऊ घातल्यानंतरच स्वत: जेवत ते म्हणत “माझ्या गायी जेवल्या तरच मी जेवणार.” श्रीकृष्णांनी इंद्राची पूजा बंद करून गाय आणि गोवर्धनाची पूजा करण्यास व्रजवासीयांना सांगितलेआणि पूजा चालूही केली. यामुळे इंद्राने रागावून अतिवृष्टी केली परंतु श्रीकृष्णांनी गोवर्धन सात दिवस उचलून धरला आणि गायींसकट सर्वांचे रक्षण केले. त्यावेळी इंद्राने शरण जाऊन श्रीकृष्णांची माफी मागण्याचे हेतूने कामधेनुस पुढे करून क्षमा मागितली. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले तू कामधेनुस पुढे केलेस म्हणून तुला क्षमा करतो अन्यथा तू क्षमेच्या लायक नाहीस तुला शिक्षेस सामोरे जावे लागले असते त्यातून तू या कामधेनुमुळे सुटलास.

विश्वामित्र
एकदा विश्वामित्र आपल्या चतुरंगिणी सेनेसहित वसिष्ठांच्या आश्रमात आले. या सेनेत लाखो सैनिक होते. वसिष्ठांच्या आश्रमात शबला कामधेनु होती. तिने सर्वांसाठी स्वादिष्ट भोजन उत्पन्न केले. ह्या भोजनाने सर्व सैनिक आणि विश्वामित्र तृप्त झाले. विश्वामित्रांना आश्चर्य वाटले की वसिष्ठांच्या आश्रमात पहाता कोठेही अन्न धान्याची कोठारे भरलेली आहेत किंवा खूप मोठी स्वयंपाक बनविण्याची व्यवस्था आहे असे कुठे दिसले नाही. तरी देखील एवढे अन्न पदार्थ एवढ्या मोठया प्रमाणावर कसे कोठून आले. एवढे सामर्थ्य वसिष्ठांना आले कोठून ? विश्वामित्रांना थोड्यावेळातच समजले की शबला कामधेनुच्या दिव्य प्रभावामुळे हे सारे वसिष्ठांना प्राप्त झाले आहे. तेव्हा त्यांनी वासिष्ठांकडे शबलेची मागणी केली. त्या बदल्यात पाहिजे तो मोबदला तुम्हाला देतो असे वसिष्ठांना विश्वामित्रांनी सांगितले. परंतु वसिष्ठ या गोष्टीसाठी तयार झाले नाहीत. म्हणून विश्वामित्रांनी आपल्या सैनिकांना शबला कामधेनूस बळजबरीने ओढून बरोबर नेण्याची आज्ञा केली. सअश्रू शबलेने वसिष्ठांना विचारले “तुम्ही मला या राजाकडे का स्वाधीन करता ?” त्यावर वसिष्ठ उत्तरले “मी या राजास तुला सुपूर्त करण्याचे नाकारले असून तो तुला बलपूर्वक नेऊ पाहतो आहे. तेव्हा तू तुला जे वाटेल ते कर.” हे ऐकून शबलाने स्वत:च्या शरीरापासून बलदंड, अनेक प्रकारचे, विविध शस्त्रास्त्रांनी युक्त असलेले सैनिक उत्पन्न केले आणि विश्वामित्रांची सेना नष्ट केली. यावर विश्वामित्रांनी शबला कामधेनुस विचारले “तुला हे सामर्थ्य कसे मिळाले ?” त्यावर शबलेने सांगितले “वसिष्ठांच्या श्रद्धा व भक्तियुक्त सेवेमुळे मला पुष्टी मिळाली आणि माझ्यात हे सामर्थ्य उत्पन्न झाले.” यावरूनच असे दिसते की श्रद्धेने गोसेवा करण्यामुळे गोमाता कामधेनु बनते.

च्यवनऋषी
च्यवन भार्गवांनी एकदा एक व्रत करावयाचे ठरविले व त्यासाठी गंगा यमुना संगमावर बारा वर्षे पर्यंत त्यांनी जलवास केला. पाण्याखाली ते निश्चलपणे एक तप पर्यंत होते. त्या अवधीत जलचरांना त्यांच्या बद्द्ल स्नेह निर्माण झाला. काही नवीन दिसले की भिऊन दूर जाणारे मासे ऋषीवर्यांच्या ओठांना देखील स्पर्श करू लागले. तीरावर राहणाऱ्या कोळ्यांनी त्या ठिकाणी एक भले मोठे जाळे टाकले व त्या जाळ्यात इतर जलचरांबरोबर च्यवन महर्षी आडकले. आपल्या जाळ्यात भरपूर मासे मिळणार या आनंदात कोळ्यांनी जाळे ओढून बाहेर काढले. ज्यांच्या अंगावर शेवाळे वाढले आहे. मधून मधून शंख शिंपले चिकटलेले आहेत असे एक ऋषी जाळ्यात पाहून कोळ्यांची पाचावर धारण बसली. जाळ्यात अडकलेले मासे पाण्याबाहेर येताच तडफडू लागले. आपल्या हातून घडलेल्या प्रमादाची जाणीव झाल्याने कोळ्यांनी च्यवनांना प्रार्थना करण्यास सुरुवात केली. “हे भगवान अनवधानाने आम्ही जाळे टाकले व आपण त्यात सापडलात, आम्हाला क्षमा करा. आम्ही काय करावे म्हणजे आपली कृपा होईल ?” माझी इछाच ऐकवायची असेल तर “या मरणासन्न माश्यांच्या बरोबर मीही मरण पत्करायचे ठरविले आहे.”

च्यवनांच्या या उत्तराने कोळी दिग्मूढ होऊन पळत पळत नहुष राजा कडे आले. कोळ्यांचे वृत्त ऐकून राजा पण मंत्रीगणांसहीत त्वरेने यमुनातीरी पोहोचला. सगळ्यांनी मिळून विनम्रपणे च्यवनांना अभिवादन केले. राजाने विचारले “आपणाला प्रसन्न करण्यासाठी आम्ही काय करावे ? हे कोळी अत्यंत गरीब आहेत मला विकत घेऊन त्या आधारे त्यांची दैन्यावस्था आपण दूर करावी. मी एक सहस्त्र निष्क आपणास देऊ का ?” काय माझी एवढीच किंमत केलीस ? नीट विचार करून पहा !” “एक लक्ष निष्क” उत्तर आले “नाही”, एक कोट निष्क, अर्धे राज्य, संपूर्ण राज्य. राजा किंमत वाढवीत होता परंतु उत्तर नकारार्थीच येत होते. मुनिवर्यांची योग्य किंमत कशामुळे होईल याचे उत्तर सापडेना. शेवटी मुनिवर्य म्हणाले “आपल्या मंत्रीगणांसहीत विचार करून उत्तर द्यावे” राजाने सगळ्यांशी सल्ला मसलत केली परंतु उत्तर काही सापडेना. इतक्यात गाविजात नावाचे एक ऋषी तेथे आले. त्यांनी आपल्या बोलण्याने सर्वांना थक्क केले. “मी गुंतागुंतीचे बोलत नसतो. मी सांगेन ते केल्यास च्यवन क्षणार्धात प्रसन्न होतील.” “अवश्य सांगा आणि मला व माझ्या प्रजेला वाचवा. ते ऋषी साऱ्या जगताला भस्मसात करून टाकतील असे सामर्थ्यवान आहेत.” गाविजांनी शांतपणे उत्तर दिले “ब्राह्मण व गोमाता समान आहेत. दोघेही अनमोल आहेत, अनर्घ्येय आहेत. तेव्हा राजन तू गोप्रदानाची किंमत द्यावीस.” तत्काळ राजा च्यवन ऋषींच्या जवळ जाऊन म्हणाला “आपण त्या जाळ्याचा त्याग करावा व बाहेर यावे. मी आपले मूल्य आपणास देण्यास तयार आहे. गोमाता हेच आपले खरे मूल्य आहे.” “हे राजन तू खरेच मोठा आहेस. गोमातेच्या बदल्यात मला तू खरीदलेस. भूतलावर गोधन सारखे धन नाही.” कोळ्यां कडून मुनिवर्यांनी गोदान स्विकारले आणि सर्व माशांसहीत कोळी स्वर्ग लोकास प्राप्त झाले. हे पाहून नहुषाला आश्चर्य वाटले.

जाबाला आणि पुत्र सत्यकाम
एक सदाचारिणी जबाला नावाची ब्राह्मण स्त्री होती. तिच्या मुलाचे नाव सत्यकाम. तो विद्याध्ययन करण्यास योग्य झाला तेव्हा त्याने आईला विचारले की “मी गुरुकुलात जाऊन अभ्यास करू इच्छितो, जेव्हा गुरुकुलात मी जाईन तेव्हा माझे गोत्र मी काय सांगू ?” तिने सांगितले “अरे तुझ्या वडिलांना गोत्र विचारण्यास मला वेळच मिळाला नाही. कारण त्यावेळी सदासर्वदा घरी येणाऱ्या अतिथींच्या सेवेत मी गर्क होते. तेव्हा तू आचार्यांनी गोत्र विचारल्यास सांग मी जबाला पुत्र सत्यकाम आहे.” सत्यकाम गौतम ऋषींकडे आला. त्यांनी त्याला नाव व गोत्र विचारले. त्यावर त्याने आईने सांगितल्या प्रमाणे सरळ उत्तर दिले. गौतम म्हणाले “वत्स ! तू एवढे सरळ साधे पणाने उत्तर दिलेस म्हणजे नक्कीच तू सदाचारी ब्राह्मणाचा मुलगा आहेस.” मग त्यांनी त्याचा उपनयन संस्कार केला आणि त्याच्याकडे ४०० गायी देऊन आज्ञा केली की ज्यावेळी याच्या एक हजार गायी होतील त्यावेळी तू माझ्याकडे परत ये. सत्यकाम गाईंना घेऊन जंगलात झोपडी बांधून जंगलात राहून गोसंवर्धन करू लागला. ज्यावेळी त्या गोवंशाची संख्या एक हजार पूर्ण झाली त्यावेळी त्या मधील एक वृषभ त्याच्याकडे आला आणि म्हणाला “आता तू आम्हाला आचार्यांकडे घेऊन चल. आता आमची संख्या पूर्ण एक हजार झाली आहे. आज मी तुला ब्रह्मतत्वाच्या पहिल्या चरणाचा उपदेश करतो. अग्नि देव स्वत: ब्रह्मतत्वाच्या दुसऱ्या चरणाचा उपदेश करतील.” संध्याकाळ झाल्यावर वाटेत सत्यकामने सगळ्या गाईंना थांबवून पाणी पाजले. त्यांच्या रहाण्याची व्यवस्था केली. काही लाकडे आणून अग्नि प्रज्वलित केला तेव्हा अग्नि देवांनी ‘अनंत’ लक्षणात्मक ब्रह्मतत्वाच्या चरणाचा उपदेश केला. नंतर उर्वरित दोन चरणांचा उपदेश हंस आणि पाणकोंबड्याने त्यास केला. गौतम ऋषींकडे पोहोचल्यावर सत्यकामचे तेज पाहूनच त्यांनी सर्व काही ओळखले व पाठ थोपटली. सत्यकाम म्हणाला “गुरुदेव मला तर मनुष्येतर जीवांनी उपदेश केला हे कसे ?” म्हणून त्यास ब्रह्मतत्वाच्या चारही चरणांचा उपदेश पुन्हा गौतमांनी केला.

हल्ली खूप स्त्रियांची प्रसूती अनैसर्गिक पद्धतीने (शस्त्रक्रिया करून) करावी लागते. जर गरोदर स्त्रीने रोज गायीला प्रदक्षिणा घातल्या तर तिची प्रसूती नैसर्गिक होते असा अनुभव आहे.

देशभक्त महादेव गोविंद रानडे
देशभक्त महादेव गोविंद रानडे यांच्या आई वडिलांना आपत्य नसल्याने ते चिंतेत होते. एकदा एक साधू भिक्षा मागण्यासाठी त्यांच्या दाराशी आला. दोघांनी त्याचा आदर सत्कार केला व त्यास भिक्षाही दिली. विचारपूस केल्यावर साधूंना त्या दोघांच्या दु:खाचे कारण समजले. त्यावर साधूंनी सांगितले “एक सवत्स काळी गाय आणावी. तिला रोज आख्खे गहू खाण्यास द्यावे. जे गहू शेणाद्वारे बाहेर येतील त्या गव्हाचे दाणे धुऊन त्याचे पीठ करून त्याच्या पोळ्या करून खाव्यात. ब्रह्मचर्य पूर्वक राहून ६ महिने अशा पोळ्या खाव्यात.” दोघांनी हे तंतोतंत पाळले आणि त्यांना पुत्र-रत्न प्राप्ती झाली.

वाढ दिवस, सणा-वाराचे दिवशी गाईस डाळ-गुळ, दलीया-गुळाची खीर किंवा गव्हाचा रवा,तांदूळ व गुळ एकत्र करून त्याची खीर गाईंना खाऊ घातल्यास ग्रह दोष जातात. गाईच्या समोर तिची सेवा करताना मनातील सदिच्छा, सद्संकल्प सांगितल्यास ते नक्कीच पूर्ण होतात.

मार्गशीर्ष शुक्ल एकादशीस मोक्षदा एकादशी किंवा वैतरणी एकादशी मानले गेले आहे. या दिवशी गोसेवा केल्यास भयंकर अशा वैतरणी नदी व आसीतपत्रादी नरकातून सहजपणे बाहेर पडतो.

श्रीकृष्ण यांनी युधिष्ठिरास सांगितले “गोवत्स द्वादशी व्रत केल्याने कुल व गोत्र तसेच ३२४ लक्ष सेनेच्या विनाशाचे महापातक नष्ट होते व हृदयास शांती मिळते.”
माणसाच्या मनातील भाव एक तर देव जाणतो किंवा गाय. अतीव दु:खाने गायीपुढे खरे खरे रडल्यास, रडू आल्यास त्याचे निराकरण गाय करते.

छत्रपती शिवाजीराजे
जेव्हा शिवाजी दहा वय वर्षांचे होते त्यावेळी त्यांचे वडील शहाजींकडे विजापूरला काही दिवसांकरिता बाल शिवाजीस नेले होते. शहाजींनी बाल शिवाजीस शाही दरबारात बादशहाच्या भेटीस बरोबर सांगितले त्यावेळी शिवाजींनी विनम्रतेने त्यांना टाळले, म्हणाले “आपण हिंदू आहोत, येथे तर रस्त्या रस्त्यातून येता जाता आपल्या डोळ्या देखत गाईंना मारले जाते, त्यांच्या मांसाचा विक्रय होतो. हे पाहून मन क्षुब्ध होते. वाटते की गोहत्या करणाऱ्या प्रत्येकाचे मुंडके छाटावे. आम्ही क्षत्रिय आहोत. गोहत्या पाहण्या पेक्षा मृत्यू परवडला. धिक्कार आहे आमच्या या क्षत्रियत्वाचा. गोहत्या करणाऱ्यांना शासन करणे किंवा मृत्यू स्विकारणे एवढे दोनच पर्याय आमच्या समोर आहेत.” बाल शिवाजी बादशहास न भेटण्याचे हे कारण बादशहाला कळले. त्याची या तेजस्वी बालकास भेटण्याची उत्सुकता वाढली. त्याने सर्व कसायांना हुकुम जारी केला. “गोहत्या व मांस विक्री शहरापासून दूर एका गल्लीतच करावी. या विरुद्ध वर्तन करणारास अपराधी समजले जाईल.” मग शिवाजी वडिलांसोबत बादशहाच्या भेटीस गेले. परंतु दोन चार दिवसातच बादशहाने स्वत:च्या आज्ञेच्या अंमलबजावणीकडे विशेष लक्ष दिले नाही असे शिवाजींना निदर्शनास आले. म्हणून त्यांनी पुन्हा दरबारात जाणे बंद करून टाकले. मग बादशहाने पुन्हा दुसरा हुकुम काढला की “कसाई व मांस विक्री करणाऱ्यांनी स्वत:ची दुकाने दक्षिणेस शहरा बाहेर एक कोस अंतरावर न्यावीत. जर कोणी हुकूम तोडला आणि त्यास एखाद्या हिंदूने मारले तर त्या हिंदूला अपराधी मानले जाणार नाही वा त्यास कोणतीही शिक्षा केली जाणार नाही.” या हुकूमानंतर पुढच्याच तीन दिवसांनी शिवाजी वडिलांबरोबर बादशहाच्या दरबारात चालले होते. एक कसाई एका गायीला जोर जोरात बडवत, बळजबरीने ओढत घेऊन जाताना त्यांना रस्त्यामध्ये दिसला. तत्काळ शिवाजींनी म्यानेतून तलवार काढली. पहिल्यांदा गाईस बांधलेला दोरखंड कापला आणि पुढच्या क्षणी त्या कसायाचे मुंडके छाटले. सर्व मुसलमान तेथे गोळा झाले. पण कोणाचीही त्या तेजस्वी बालकास हात लावण्याची हिम्मत झाली नाही. त्या कसायाच्या नातेवाईकांनी बादशहाकडे लगेचच बाल शिवाजीस शिक्षा करण्याची फिर्याद केली. परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही.

आजारी माणसे, लहान मुले, सारखी रडणारी मुले यांना गाईच्या शेपटीने डोक्यापासून पाया पर्यंत स्पर्श करून फिरविल्यास दोष नाहीसे होतात. जुन्या गोघृताने ज्वर असणाऱ्या व्यक्तीस लेपन केल्यास ज्वर नाहीसा होतो.

गौतम बुद्धाला सुजाता नावाच्या बालिकेने गाईचे दूध प्यायला दिले मग त्यांना मनुष्यजीवन बोध झाला.

गोंदवलेकर महाराज
गोंदवल्या पासून दहा कोसावर एका गावात एक सुखवस्तू कुटुंब रहात होते. शेते बरीच असल्याने बरीच जनावरेही ठेवली होती. कालांतराने परिस्थिति खालावल्यामुळे मालकाने जनावरे काढण्यास सुरुवात केली. त्यात एक गंगा नावाची लंगडी गाय होती. तिला एकाच्या सांगण्यावरून गोंदवलेकर महाराजांना देण्यासाठी नेली. त्यांनी तिला ठेवूनही घेतले. परिस्थिती सुधारल्यावर तो मनुष्य तिला न्यायला आला चारपाच दिवस महाराजांजवळ राहून गंगेला नेण्यासाठी महाराजांबरोबर त्यांच्या गोठ्यात आला. महाराज तिला तिचे दावे सोडत म्हणाले “गंगे ते बघ तुला नेण्यासाठी आले आहेत. त्यांच्या बरोबर आनंदाने जा हं !” आणि दोरी मालकाच्या हाती दिली. लगेच तिने मोठा हंबरडा फोडला, तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले व महाराजांकडे पाहू लागली. ते पाहून मालकाला काय करावे सुचेना. शेवटी तिला तेथेच ठेवून तो मालक निघून गेला. महाराजांना पाहिल्यावर ती दाव्याला हिसके देई. तिला मोकळी सोडल्यावर महाराजांच्या मागे मागे जाई. मग त्यांनी तिला कुरवाळून काही न काही संभाषण केल्यावर ती पुन्हा गोठ्यात येई.

गोंदवलेकर महाराज स्वत: म्हणत की गाई मध्ये मानवी भावना आहे. कृष्णराव नावाचा अधिकारी त्यांचा शिष्य होता. गोंदवल्यास गाईंची संख्या खूप झालेली पाहून मला चारा वगैरे फुकट मिळतो तेव्हा मी चार गायी घेऊन जातो असे महाराज नको म्हणत असताना आग्रहाने घेऊन गेला. त्याने काही दिवस त्यांची व्यवस्था चांगली केली. नंतर मात्र त्यांच्याकडे त्याचे संपूर्ण दुर्लक्ष झाले. त्या मारायला टेकल्या धड त्यांना पाणीही मिळेनासे झाले. इकडे गोंदवलेकर महाराजांना दृष्टांत झाला त्या म्हणू लागल्या “अन्न पाण्याविना आम्ही मरत आहोत. आम्हाला गोंदवल्यास घेऊन जा. आपल्या जवळ मरण आलेले पत्करले पण इथे असले जगणे नको.” तत्काळ महाराजांनी नीलकंठ नामक सेवकास देवाचे तीर्थ गाईंना पाजण्या करिता त्याच्या बरोबर दिले आणि सांगितले की आत्ताच्या आत्ता त्या गाईंना येथे घेऊन ये. गाईंच्या अंगात चालण्याची सुद्धा शक्ती उरली नव्हती म्हणून त्यांना येण्यास उशीर झाला. महाराजांच्या समोर आल्यावर त्या सर्व गायींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यातली एक गाय हंबरडा फोडून खाली पडली महाराजांनी तिचे डोके मांडीवर घेतले मग तिने प्राण सोडले. ते म्हणाले “आपण गाईवर प्रेम करतो ते तिला कळते. ती मनुष्य समाजाला उपयोगी पडतेच परंतु गाईत मानवी भावना आहे त्यामुळे तिला विशेष महत्व आहे.ती भगवंतालाही फार प्रिय आहे.”

गोंदवल्या पासून जवळच म्हसवड नावाचे गावात दरवर्षी यात्रा होई तेथे बाजारात गायी विकण्यास आणल्या जात असत. त्या गाई कसाई लोक खरेदी करतात व कापायला घेऊन जातात. हे समजल्या पासून गोंदवलेकर महाराज स्वत: दर वर्षी तेथे जाऊन सगळ्या गाई खरेदी करून आणत आणि आपल्या गोशाळेत त्यांना सांभाळत. ते शेतकऱ्यांना गाईंचे महत्व समजून सांगत आणि गायींची विक्री करू नये असे सांगत. त्यांच्या गोशाळेत ते स्वत: जाऊन बसत तेथे स्वत: साफ सफाई, झाड लोट करत. महारोग्यांना त्यांनी तेथे गाईंची सेवा करविण्यास लावून त्यांचे रोग बरे झाले. एकदा एक कसाई गाईंना खाटिक खान्यात घेऊन जाताना गोंदवल्यात राहिला. महाराजांना हे समजतातच जेथे तो होता तेथे ते आले त्याला समजावून सांगण्या साठी ते म्हणाले “या गायींची किंमत मी तुला देतो. या गायी सोडाव्यात. यात मोठे पाप आहे. त्या गाईंना काय यातना होतात याची तुला कल्पना नाही तेव्हा हा धंदा पुन्हा तू करू नयेस.” कसाई म्हणाला “छे त्या गाईंना एवढे कुठे कळते” त्यावर महाराज म्हणाले बरे आहे मग असे करू की ज्या गाई मी बोलावल्यावर येतील त्य माझ्या आणि तू बोलावल्यावर आल्या तर त्या तुझ्या. गाईंना मोकळे करण्यात आले. मग महाराजांनी दोनशे पावलांवर जाऊन “गंगा, यमुना, गोदावरी, कपिले, कृष्णे, तुंगे, सरस्वती या ग या, या दीन दासा जवळ या !” अशी हाक मारली मात्र त्या सर्व गाई शेपट्या वर करून हंबरडा फोडत महाराजांच्या जवळ आल्या आणि त्यांना चाटू लागल्या. मध्ये महाराज आणि भोवताली सगळ्या गाई हे पाहून तो कसाई हतबल झाला. दुसऱ्या दिवशी गुपचूप सगळ्या गाई तेथेच ठेऊन निघून गेला. महाराज म्हणाले “गोसंरक्षणासाठी उपासनेचे बळ मिळावा गाईंचे रक्षण ही भगवंताची सेवा केवळ त्याच्याच साठी म्हणजे भगवंता साठीच असावी.”

गाय प्राणीमात्रांना दूध देते म्हणूनच तिला धरतीचा प्राण म्हणतात. म्हणून दुभती गाय दान केल्यास. प्राणदान केल्याचे पुण्य मिळते. गोदान करणारा मनुष्य आपल्या आधीच्या सात व नंतरच्या सात पिढ्यांचा उद्धार करतो. जो एक गाय आणि एक बैल दान करतो त्यास वेदाध्ययनाचे फल मिळते. जो विधीपूर्वक गोदान करतो तो उत्तम लोक प्राप्त करून घेतो. सात्विकतेने, स्वकष्टार्जित एक काळी गाय दान केल्यास पुरुष पापमुक्त होतो. जो मनुष्य सकाळी उठून गाईच्या शिंगांवर पाणी ओतून तिचे मस्तक धुतो व ते पाणी स्वत:च्या मस्तकावर धारण करतो तो समस्त तीर्थांचे स्नान केल्याचे पुण्य प्राप्त करतो.

उभयमुखीधेनु दानास शास्त्रामध्ये खूप महत्व आहे. विणारी गाय म्हणजे उभयमुखी गाय. बछड्याचा कोणताही भाग बाहेर दिसायला सुरुवात झाल्या पासून जो पर्यंत तो संपूर्णतः बाहेर येत नाही तो पर्यंत विणाऱ्या गाईस उभयमुखीधेनु म्हणतात. विणाऱ्या गाईस शास्त्राने पृथ्वीचे स्वरूप मानले आहे. म्हणून गाय व्यायच्या वेळेत या गाईच्या दानाचा संकल्प केला असता पृथ्वीचे दान केल्याचे फळ प्राप्त होते. याने गाय आणि बछडा या दोहोंच्या अंगावर मिळून जेवढे रोम असतील तेवढी युगे दाता देवलोकात पूजनीय होतो व आपल्या पितरांचा उद्धार करतो.

गो सेवेसाठी महत्वाचे दिवस
१) पाडवा (चैत्र शु. प्रतिपदा)
२) अक्षय तृतीया, परशुराम जयंती (वैशाख शु. तृतीया)
३) कृष्णाष्टमी (श्रावण कृ. अष्टमी)
४) सर्वपित्री अमावस्या (भाद्रपद अमावस्या)
५) वसु बारस (अश्विन कृ. द्वादशी)
६) गोपाष्टमी (कार्तिक शु. अष्टमी)
७) मोक्षदा / वैतरणी एकादशी (मार्गशीर्ष शु. एकादशी)
८) गुरु प्रतिपदा (माघ कृ. प्रतिपदा)
९) होळी पौर्णिमा (फाल्गुन पौर्णिमा)