गो भक्त आणि गोसेवक तसेच गो पालक ह्या तिन्ही जणांना स्वतःच्या गुणांची वृद्धी करणे आवश्यक आहे. बुद्धि आणि बल याचा उपयोग उत्तम रीतीने करू शकणारेच उत्तम गोभक्त, उत्तम गोसेवक किंवा उत्तम गोपालक बनू शकतील. अन्यथा गायींचा ऱ्हास करण्यास ते कारणीभूत ठरतील.
जे लोक स्वतःला गो भक्त, गोसेवक म्हणवून घेत असतील त्यांना आधी भक्ती तसेच सेवा या दोन्ही शब्दांचा अर्थ समजावून घेणे जरुरी आहे.
रामदास स्वामींच्या सांगण्याप्रमाणे भक्त किंवा उत्तम सेवक तोच आहे जो सात्विक वृत्तीचा, शांत सुस्वभावी असलेला, आशाळभूत / हव्यास नसलेला, सद्बुद्धी असलेला, सुशिक्षित सात्विक व्यक्तींची संगत असलेला, ज्ञान प्रिय असलेला, परोपकारी तसेच स्वतःच्या आई वडील आणि वडिलधाऱ्या व्यक्तींचा आदर करणारा आहे.
भक्ती म्हणजेच उत्तम प्रेम असणे. भक्ती म्हणजे विना सायास प्रेम असणे. अर्थात स्वतःला काही हवे म्हणून संग न करणारा होय. अर्थातच गोभक्त तोच जे गायीच्या संदर्भात तत्पर आहे. एखाद्या किंवा अनेक गायींच्या साठी प्रेमाने कार्य करीत राहणारा.
जो गोसेवक हा उत्तम गोसेवक असेल तो आपल्याला जे सेवाकार्य / काम करायचे आहे त्या बाबत त्याला उत्तम, योग्य आणि संपूर्ण ज्ञान घ्यावे लागेल. म्हणजेच गोभक्त तसेच गोसेवक दोघांनाही गायी बाबत संपूर्ण ज्ञान घेणे जरुरीचे आहे जेणे करून त्यांची सेवा किंवा भक्ती ही उत्तम सेवा किंवा भक्ती असेल आणि अर्थातच गायींना आणि समाजाला निश्चितच १००% त्याचा फायदा होईल. त्यासाठी गाय आणि गोपालन या संदर्भातील वाचन करावे.
गाय आणि गोपालन
गोपालन आणि गोसंवर्धन हे दोन्ही शब्द वरकरणी एकच वाटत असले तरीही या दोन्ही शब्दांचे अर्थ वेगळे आहेत. गोपालन करणारा जो असतो तो गोसंवर्धन करणारा असेलच असे नाही.
गोपालन म्हणजे गायी पाळणे अर्थात त्या व्यक्तीकडे आर्थिक आणि जागेचे नियोजन / व्यवस्था आहे म्हणून त्याने गायी ठेवल्या आहेत परंतु तो रोज त्या गायींना स्वतःहून खाणे, पिणे त्यांचे बाळंतपण करणे आदी रोजचे काम करत नसतो.
परंतु गोसंवर्धन करणारा मात्र दररोज त्या गायींना स्वतःहून खाणे, पिणे त्यांचे बाळंतपण करणे, त्यांचे आजारपणात औषधपाणी करणे, पोषक आहार आदी आदी रोजचे काम करत असतो.
भारतात अनेक ठिकाणी अनेक प्रकारच्या गायींच्या जाती आढळतात. त्या त्या प्रकारच्या गायींचा सांभाळ त्या त्या ठिकाणी केला जावा हे उत्तम. ज्यावेळी त्या गायींचे स्थान आणि वातावरण बदलले जाते त्यावेळी तिच्या उत्पादकतेत निश्चित बदल होतो. म्हणून शक्यतो त्या त्या प्रांतातील गायींचा सांभाळ, पालन / संगोपन त्या त्या प्रांतातच केले जावे.
सर्व गोभक्त, गोपालक, गोसेवक, गोसंवर्धक, गोरक्षक यांनी गाय सांभाळणे, गो व्यवस्थापन, गोसंवर्धन याबाबतची संपूर्ण माहिती घेऊनच स्वतःचे कार्य सुरु करावे. म्हणजे उत्तम गोवृद्धी होईल यात शंका नाही. गौ पालन / गौ संवर्धन म्हणजे केवळ गायींना नुसती खाण्यापिण्याची सोय करून त्यांचा शेण गोठा करणे एवढेच नव्हे तर त्यांची सर्व प्रकारे उत्तम काळजी घेऊन त्यांचे वर्धन करणे आहे. कर्माचे वर्म माहित करूनच कामाला सुरुवात केली तरच उत्तरोत्तर उत्तम गोवंश देखील तयार होईल आणि समस्त मनुष्य समाजाला त्याचा फायदा होईल.
देशी आणि विदेशी (बिलायती) गाईंमधील फरक
‘गो’ शब्दाचा अर्थ असा आहे की, बैल इत्यादी प्राणी रथ ओढतात आणि गाय दान केल्यावर ती स्वर्गात घेऊन जाते, म्हणून तिला ‘गो’ म्हणतात. गाय हा चतुष्पाद (चार पाय असलेला) प्राणी आहे. तिचे खूर मधून दुभंगलेले असतात आणि पाठीवर एक उंचवटा असतो, ज्याला संस्कृतमध्ये ‘ककुद’ आणि इंग्रजीत ‘हंप’ (Hump) म्हणतात. गाईच्या डोक्यावर दोन शिंगे आणि मागे एक लांब शेपटी असते. त्यांचे संपूर्ण शरीर केसांनी (रोम) झाकलेले असते आणि त्या पांढऱ्या, काळ्या, पिवळ्या, लाल अशा विविध रंगांच्या असतात. शेपटीचे केस लांब आणि जाड असतात. गाईला वर आणि खाली मिळून एकूण ३२ दात असतात. खालच्या बाजूला दोन्ही बाजूंना सहा-सहा करून एकूण १२ दात चघळण्यासाठी आणि १८ दात छेदण्यासाठी (तोडण्यासाठी) असतात. छेदण्याचे दात वरच्या जबड्यात नसतात. खालच्या दातांच्या सहाय्याने गवत कापून आणि चघळण्याचे दात वापरून गाय आपला आहार घेते. एकदा खाल्लेले अन्न त्या पुन्हा बाहेर काढून रवंथ करतात / (र्युमिनेशन/जुगाळी करून) चघळतात.
पाश्चात्य शास्त्रज्ञांनी असे निश्चित केले आहे की, भारतीय गाय गाभण राहिल्यानंतर २७० ते २८० दिवसांच्या कालावधीत व्याते. प्रा. हॉजसन (Hodgson) यांच्या मते, आपल्या देशातील गाईंना दोन्ही बाजूंना १४ बरगड्या (पंजरास्थी) असतात. त्यांच्या कपाळावर २८ आणि मानेमध्ये ७ हाडे असतात. गाईंच्या पचनसंस्थेत ४ कप्पे (थैल्या) असतात आणि प्रत्येक कप्पा स्वतंत्रपणे कार्य करतो. गाईंची घ्राणेंद्रिये (वास घेण्याची शक्ती) आणि श्रवणेन्द्रिये (ऐकण्याची शक्ती) अतिशय तीक्ष्ण असतात, परंतु डोळ्यांची शक्ती या दोन इंद्रियांच्या तुलनेत काहीशी कमी असते. गाईंच्या शरीरातील दातांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. दात आणि शिंगांवरून गाईचे वय आणि प्रसव काळ निश्चित केला जातो.
विदेशी गाईंना मातृगर्भातच दात फुटतात, परंतु भारतीय गोवंशामध्ये काही काळानंतर दुधाचे दात पडून कायमस्वरूपी दात येतात. जन्मानंतर सहा महिन्यांच्या आत दुधाचे दात येऊ लागतात आणि वर्षभरात ते सर्व बाहेर येतात. दीड वर्षांनंतर दुधाचे दात पडून त्या जागी कायमस्वरूपी दात (Permanent incisors) येतात. दुसऱ्या वर्षी मधले दात उगवतात आणि साडेचार वर्षांत पुढचे दात येऊन मुख पूर्ण आकार धारण करते.
भारतीय गोवंशाचा मांडीचा भाग (उरु-देश) विदेशी गाईंसारखा मांसल नसतो आणि म्हणूनच त्यांचे पाय लांब दिसतात. बरगड्या १४ असतात, असे आधी नमूद केले आहे; विदेशी गाईंना फक्त १० असतात. आपल्याकडच्या गाईंची छाती रुंद आणि बरगड्यांची हाडे जाड, गोल असतात. भारतीय गाई त्यांच्या वंश आणि परिवारानुसार विविध आकारांच्या असतात.
पाश्चात्य शास्त्रज्ञांच्या मते भारतीय गोवंशाला ‘जेबू’ (Zebu) असे नाव आहे. गाईंच्या खांद्यावर असलेला मांसपिंड (ककुद/हंप) हीच भारतीय गोवंशाची खरी ओळख आहे. विदेशी गोवंश ‘हंप’ विरहित असतो.
गाईंच्या तुलनेत बैल आणि सांडांची ‘हंप’ मोठी असते. ही थुई मोठी असल्यामुळे ती अतिशय सुंदर दिसते आणि त्यावरून त्या पशूच्या बळाचा अंदाज येतो. आपल्या गाईंची कपाळपट्टी कासवाच्या पाठीसारखी असते. विदेशी गाईंसारखी ती केसांनी झाकलेली (shaggy) नसते. शिंगेही साधारणपणे पुढच्या बाजूला झुकलेली असतात. म्हैसूर आणि इतर काही मोठ्या जातींच्या गाईंची शिंगे वरच्या दिशेला असलेली आणि दंडगोलाकार (cylindrical) असतात. भारतीय गाईंचे कान काहीसे तीक्ष्ण असतात. शेपटीवरील केसांचा गुच्छ अतिशय सुंदर दिसतो. पश्चिम भारतीय बेटे, ब्रिटीश गयाना, ऑस्ट्रेलिया, उत्तर अमेरिका यांसारख्या अनेक ठिकाणी भारतीय गोवंश आढळतो. संकरित गाई उत्पन्न करण्याच्या उद्देशानेच त्या देशांतील लोकांनी आपल्याकडच्या गाई नेल्या होत्या.
गायीची निवड – गायीची खरेदी करताना घ्यावयाची काळजी
०१) खरेदी करावयाच्या गायीच्या जातीनुसार शारिरीक वैशिष्ट्यांची निरीक्षण करणे .
०२) गाभण गायी घेण्याचे टाळावे कारण तिच्या गर्भाशयाचे व सडांचे रोग समजणे कठीण असते.
०३) व्यालेल्या गायी खरेदी करताना सलगपणे तिचे स्वतः तीन वेळा पूर्णपणे दूध काढून फेस मुरल्यावर मोजावे व त्यावरूनच गायीची दूध देण्याची क्षमता ठरवावी. दूध काढताना ओटी सडात गाठी अथवा सूज नसल्याची खात्री करून घ्यावी.
०४) दुभत्या गायीच्या पोटाच्या खालील भागात कातडी खाली शरीरास समांतर दोन दूध वाहिन्या असतात त्यांचे निरीक्षण करून दूध देण्याची क्षमता कळू शकते. कोणत्याही गायीचे दूध काढल्यावर तिच्या पोटाला घडी पडणे आवश्यक आहे. अन्यथा सूज आहे असे समजून तपासणी करावी.
०५) गायीने वासराला जन्म दिला असल्याचे एक ते दीड महिन्यापर्यंतच्या काळात वासराचे शिंग अथवा गायीच्या तुटलेल्या नाळेवरून ठरविता येते.
०६) साधारणपणे गायीला पहिली तीन वेत होई पर्यंत दूध वाढत जाते नंतरची दोन वेत होई पर्यंत तेवढेच रहाते व त्या नंतर दूध कमी होत जाते.
गाय- म्हैस वारंवार उलटल्यामुळे अनिश्चित काळासाठी गर्भधारणा होत नाही. यासाठी पशुप्रजनन व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. गाय- म्हैस उलटण्याची, तसेच गाभण न राहण्याची कारणे शोधून वेळीच औषधोपचार आणि सुयोग्य व्यवस्थापन केल्यास दोन वेतांतील अंतर, तसेच भाकडकाळ कमी होऊन पशुपालकाचे आर्थिक नुकसान टाळता येते. गाय- म्हैस उलटण्याच्या अनेक कारणांपैकी प्रमुख दोन कारणे म्हणजे त्यांचा माज ओळखता न येणे आणि पशुपालकाद्वारे माजाची दखल न घेणे. यामुळे माजाच्या योग्य वेळेत नैसर्गिक, कृत्रिम रेतन करता येत नाही. त्यामुळे पुढे आर्थिक नुकसान होऊ शकते.
अ) जनावरांतील माज ओळखू न येणे
बऱ्याच जनावरांमध्ये माजाची लक्षणे अस्पष्ट दिसून येतात, तसेच माजाचा कालावधी कमी असतो. गाई- म्हशींमध्ये रात्रीच्या वेळी माजावर येण्याचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे पशुपालकाकडून जनावरांचा माज ओळखण्यात येत नाही. जनावरांच्या माजाकडे पशुपालकाचे दुर्लक्ष होऊन माजावर आलेली जनावरे वेळेवर भरली जाऊ शकत नाहीत, त्यामुळे ती नियमित अंतराने वारंवार माजावर येतात.
ब) जनावरांच्या माजाच्या लक्षणांविषयी पशुपालकाचे अज्ञान
माजावर आलेल्या गाई- म्हशी बिनचूक न ओळखणे, त्यांच्यामधील माजाच्या लक्षणांविषयी माहिती नसणे, माजावरील जनावरांकडे दुर्लक्ष करणे इत्यादी कारणांमुळे जनावरे वेळेवर न भरली गेल्यामुळे वारंवार उलटतात. माजावरील गाय- म्हैस ओळखण्यासाठी माजाच्या लक्षणांची माहिती करून घ्यावी; तसेच कळपातील जनावरांच्या हालचालींकडे पशुपालकाने वारंवार लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
०१.माजाची लक्षणे ही जनावरे स्पष्ट माजावर येण्यापूर्वीची लक्षणे, जनावरातील स्पष्ट पक्का माजाची लक्षणे आणि जनावरातील स्पष्ट पक्का माज संपल्यानंतरची लक्षणे या तीन प्रकारांत मोडतात. जनावरे स्पष्ट माजावर येण्यापूर्वी कळपातील दुसऱ्या जनावरांबरोबर लगट करण्याचा प्रयत्न करतात. कळपातील इतर जनावरांवर उड्या मारतात. गाय- म्हैस अधूनमधून हंबरते, कान टवकारते, अस्वस्थ आणि बेचैन होते, त्यांची भूक मंदावते, दूध कमी होते, गोठ्यामध्ये फिरण्याचे प्रमाण वाढते, योनीचा भाग किंचित लालसर ओलसर आणि सुजल्यासारखा दिसतो. स्पष्ट माज येण्यापूर्वी गाई- म्हशीमधील लक्षण म्हणजे तिच्या पाठीवर जनावरे उड्या मारत असतील तर ती शांत उभी न राहता पुढे पळत जाते. म्हशीमधील वरील सर्व माजाची लक्षणे दिसतीलच असे नाही. म्हशींमध्ये मुका माज दाखविण्याचे प्रमाण अधिक असते.
०२. स्पष्ट माजावर आलेली गाय- म्हैस कळपातील वळूकडे आकर्षित होऊन जवळ जाऊन उभी राहते. तिच्यावर वळू किंवा दुसरी जनावरे पाठीमागून उड्या मारत असल्यास माजावर आलेली गाय- म्हैस स्थिर उभी राहते यालाच आपण “पक्का माज, खडा माज’ असे म्हणतो. माजावर आलेली गाय- म्हैस शेपटी उंचावून वारंवार लघवी करते. योनीमार्गातून पारदर्शक काचेसारखा स्वच्छ चिकट स्राव/ सोट तारेसारखा बाहेर लोंबकळू लागतो आणि तो जनावराच्या शेपटीवर तसेच मागील भागावर चिकटलेला आढळून येतो. माजावर आलेल्या जनावराचे तापमान ०.५ अंश ते एक अंशाने वाढते. गाई- म्हशीमध्ये माजाची वरील लक्षणे आढळून आल्यावर कृत्रिम, नैसर्गिक रेतन करण्याचा योग्य कालावधी आहे.
०३. स्पष्ट, पक्का माज संपल्यानंतर दोन- तीन दिवसांनी बहुतांश गाईंच्या योनीमार्गातून थोड्या प्रमाणात रक्तस्राव बाहेर पडताना दिसतो. माज संपल्यानंतर गाईच्या शरीरात इस्ट्रोजनचे प्रमाण कमी होते आणि प्रोजेस्टेरॉन या संप्रेरकाचे प्रमाण वाढत जाते. गर्भाशयाच्या आतील आवरणात असलेल्या ग्रंथीवर या संप्रेरकाचा प्रभाव होऊन त्या ग्रंथीमधून रक्तस्राव होतो. ही एक नैसर्गिक बाब आहे.
४. गाईसाठी ओळख क्रमांक – गाय- म्हैस ओळखण्यासाठी तिच्या कानामध्ये अथवा गळ्यामध्ये ओळख क्रमांक असणे आवश्यक आहे. यामुळे माजावर आलेली जनावरे कळपातून वेगळी करून त्यांची नोंद घेणे सोयीचे ठरते.
०५. गोठ्याची रचना व प्रकाशव्यवस्था – गोठा पुरेसा मोठा आणि स्वच्छ असावा. गोठ्यामध्ये स्वच्छ खेळती हवा आणि भरपूर सूर्यप्रकाश तसेच रात्रीच्या वेळी दिव्यांचा प्रकाश असावा. यामुळे माजावर आलेली जनावरे ओळखण्यास मदत होते.
०६. गाईच्या प्रजननाविषयी नोंदवही – नोंदवहीमध्ये पशुपालकाने कालवडीची जन्म तारीख, प्रथम माजावर आल्याची नोंद, सोटाचे वर्गीकरण, कृत्रिम/ नैसर्गिक रेतन केल्याची तारीख, वापर केलेल्या वळूची नोंद, गर्भ तपासणीची तारीख, गाभणकाळ, विण्याची अंदाजे तारीख, व्याल्याची तारीख, प्रसूतिकाळात आणि पश्चात आजाराची नोंद, वासराचे वजन आणि लिंग, दैनंदिन दुधाची नोंद, विल्यानंतर माजावर आल्याची तारीख, भाकडकाळ इत्यादी बाबींचा उल्लेख असावा.
०७. कळपातील प्रत्येक जनावरावर लक्ष ठेवणे – पशुपालकाने जनावरांच्या हालचालींवर दिवसातून कमीत कमी चार वेळा म्हणजे पहाटे, सकाळी, संध्याकाळी आणि रात्री अर्धा- अर्धा तास लक्ष ठेवणे आवश्यक आहे. बहुतेक जनावरांमध्ये माजाची लक्षणे रात्री अथवा पहाटे स्पष्ट दिसून येतात.
०८. गाई- म्हशींना मुक्त निवारा पद्धतीचा वापर करणे – ठाणबद्ध गाई- म्हशींपेक्षा मुक्त निवारा पद्धतीमध्ये जनावरे माजाची लक्षणे स्पष्ट दाखवितात. पशुपालकाला कळपातील माजावर आलेली मादी ओळखून वेगळी करता येते. जनावरांना दूध काढून झाल्यानंतर आणि आंबवण दिल्यानंतर मुक्त निवारा पद्धतीच्या गोठ्यामध्ये सोडावे. गोठ्यात मुबलक स्वच्छ पाणी, चारा- गवत असावे. गोठ्यातील जमीन निसरडी नसावी.
०९. गाईच्या प्रजनन काळाविषयी माहिती देणारा गोलाकार तक्ता – जनावरांच्या प्रजननाविषयी सर्व नोंदी असल्यास पुढील माजाच्या तारखा, विण्याच्या तारखा या तक्त्याच्या आधारे बिनचूक बघता येतात.
१०.कळपात नसबंदी केलेला वळू सोडणे : गाईच्या कळपांमध्ये नियमित माज ओळखण्यासाठी नसबंदी केलेला वळू सोडण्यात येतो.
११.जनावरांच्या पायाची गती मोजण्यासाठी पायाला बसविण्याचे उपकरण – माजावर आलेली जनावरे माजाच्या कालावधीत माजावर नसतानाच्या कालावधीपेक्षा दुप्पट चालतात. या यंत्रावर दर्शविलेल्या आकड्यांवरून कळपातील माजावर आलेली जनावरे ओळखता येतात.
१२.जनावरांचा माज ओळखण्यासाठी श्वानांचा वापर – काही देशांमध्ये कळपातील जनवारांचा माज ओळखण्यासाठी प्रशिक्षण दिलेले श्वान, कुत्रे दररोज विशिष्ट वेळी कळपात सोडण्यात येते. हे श्वान जनावरांचा पार्श्वभाग हुंगते आणि माजावर आलेली जनावरे शोधून काढते.
१३.जनावरातील “माजाचे संनियंत्रण’ – कळपातील अनेक जनावरांना एकाच वेळी एकाच दिवशी माजावर आणण्यासाठी सर्व गाई- म्हशींना “प्रोस्टॉग्लॅडिन’ घटक असलेले इंजेक्शन देण्यात येते. माजावर आल्यानंतर एकाच वेळी सर्व जनावरांमध्ये कृत्रिम रेतन करून घेता येते.
१४. रक्तातील- दुधातील “प्रोजेस्टेरॉन’चे प्रमाण – जनावरांच्या रक्तातील- दुधातील “प्रोजेस्टेरॉन’ या संप्रेरकाच्या प्रमाणावरून जनावर माजावर आहे किंवा नाही याचे निदान करता येते. माजावर असलेल्या जनावरांच्या दुधातील- रक्तातील प्रोजेस्टेरॉन या संप्रेरकाचे प्रमाण अत्यल्प असते.
१५.सिद्ध वळूच्या साह्याने नैसर्गिक पैदास – ज्या वेळी पशुपालकांना गाई- म्हशींमधील माज ओळखणे शक्य होत नाही, अशा वेळी कळपामध्ये उत्कृष्ट प्रजनन क्षमता असलेला सिद्ध वळू सोडल्यास माजावर आलेली जनावरे ओळखून नैसर्गिक पैदासीद्वारे गर्भधारणा घडवून आणता येते.
खूर वाढीवर ठेवा नियंत्रण
जनावरांत खुरांची वाढ ही एक सततची नैसर्गिक प्रक्रिया असून, ती बंदिस्त गोठ्यात जास्त प्रकर्षाने जाणवते. जी जनावरे सतत चालतात किंवा श्रमाची कामे करतात. त्यांच्यामध्ये खुरांचे जमिनीशी घर्षण होऊन ती प्रमाणात राहतात. सध्या मात्र खुरांची अतिरिक्त वाढ होण्याचे प्रमाण वाढले आहे. अतिरिक्त खूरवाढीचा दुष्परिणाम जनावरांच्या आरोग्यावर व हालचालींवर होतो. खुरांची अतिरिक्त वाढ ही केवळ मोठ्या जनावरांत म्हणजे गाई आणि म्हशीतच नसून, ती शेळीसारख्या लहान प्राण्यांमध्येही आढळते. खूरवाढीवर वेळेवर उपाययोजना केल्या नाहीत, तर मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते.
कारणे –
– अतिशय कमी हालचाल.
– जनावरांना एकाच जागेवर जास्त वेळ बांधून ठेवल्यामुळे खुरांचे जमिनीशी घर्षण होत नाही त्यामुळे खुरांची अतिरिक्त वाढ होते.
– जनावरांतील आनुवंशिक गुणधर्म व शारीरिक विकृती.
– जास्त वयस्कर जनावरे.
– शरीरातील कॅल्शिअमचे अधिक प्रमाण.
– जनावरांतील शारीरिक कमजोरी.
– संतुलित आहाराचा अभाव.
दुष्परिणाम –
– जनावरे कमजोर आणि आजारी दिसू लागतात.
– जनावरांना चालताना त्रास होतो.
– जनावरांचे खाद्य खाण्याचे प्रमाण घटते.
– जनावरे चालताना लंगडतात.
– जनावरांची उत्पादनक्षमता कमी होते.
– खुरांत जखमा होतात.
– चालताना जखमा होऊन त्यातून रोगजंतूंचा शरीरात प्रसार होतो.
प्रतिबंध –
– जनावरांना एकाच जागेवर जास्त काळ बांधून ठेवू नये.
– शक्यर असल्यास जनावरांना थोडा काळ चरण्यासाठी सोडावे, जेणेकरून खुरांची झीज होऊन ती अतिरिक्त वाढणार नाहीत.
– खुरांची अतिरिक्त वाढ असणाऱ्या नर आणि माद्यांची निवड करू नये.
– कमी जागेत जास्त जनावरे ठेवू नयेत.
– गोठ्यातील जमीन गुळगुळीत किंवा मऊ नसावी.
– गोठ्याची नियमित स्वच्छता करावी.
उपाय –
ज्या जनावराची खुरे अतिरिक्त वाढली आहेत, त्या जनावरांची खुरे पशुवैद्यकाच्या मदतीने योग्य पद्धतीने आणि योग्य अंतरावर कापावीत. शक्य तो तांत्रिकदृष्ट्या सक्षम व्यक्तीकडूनच खुरांचा अतिरिक्त भाग कापावा. कारण अयोग्य खूर कापणीमुळे रक्तस्राव होऊन त्यात जखम होऊ शकते.
थंड वातावरणात जपा जनावरांना थंडीमध्ये जनावरांना पिण्यासाठी जास्त थंड पाण्याचा वापर टाळावा. पाण्यामध्ये गूळ किंवा मीठ किंवा ज्वारीचे पीठ मिसळून द्यावे. आहारात अधिक ऊर्जा देणाऱ्या खाद्यघटकांचा (उदा. ज्वारी, गहू, मका यांचा भरडा इत्यादी) वापर करावा, यामुळे शरीरात ऊर्जा निर्माण होऊन प्रतिकारशक्ती वाढते. कोरड्या चाऱ्याचे प्रमाण वाढवावे.
तापमानातील बदलामुळे जनावरांच्या शरीराचे तापमान देखील थोड्याफार प्रमाणात बदलते. हे शारीरिक तापमान एका विशिष्ट मर्यादेत राखले जाते. त्यासाठी जनावरांच्या शरीरात निर्माण होणारी अंतर्गत शारीरिक उष्णता आणि बाहेरील वातावरणातून मिळणारी उष्णता यांचा समतोल राखावा लागतो. थंडीच्या दिवसांत वातावरणातील तापमान जनावरांच्या शारीरिक तापमानापेक्षा कमी असते, त्यामुळे शरीरातील उष्णतेचे उत्सर्जन होते.
– हिवाळ्यात जनावरांच्या शरीराचा सभोवतालच्या थंड जमिनीशी संपर्क आल्यास त्यांच्या शरीरातील उष्णता जास्त प्रमाणात बाहेर पडते. जनावराच्या शरीराला झोंबणारी थंड हवा देखील त्याच्या शरीरातील उष्णता जास्त प्रमाणात बाहेर पडण्यास कारणीभूत होते. अशा प्रकारे थंड हवा शरीरावरून जास्त प्रमाणात फिरल्यास शरीरातील उष्णतेचा जास्त प्रमाणात ऱ्हास होतो.
– जनावरांच्या त्वचेमध्ये घर्मग्रंथी कमी असतात, त्यामुळे बाष्पीभवनाद्वारे होणारा उष्णतेचा विसर्ग नाकातून श्वासाद्वारे अधिक होतो. हवेत असणारी आर्द्रता अशाप्रकारच्या उष्णतेच्या ऱ्हासावर अप्रत्यक्ष नियंत्रण ठेवत असते. वातावरणात आर्द्रता जास्त असल्यास जनावरांच्या शारीरिक उष्णतेचा विसर्ग कमी होतो.
जनावरांची काळजी –
– गोठ्याच्या खिडक्यांना रिकामे पोते (बारदाना) बांधून थंडीपासून जनावरांचा बचाव करावा.
– जनावरांना बसण्यासाठी भुश्श्याची गादी करावी. गोठ्यातील जमीन कोरडी राहण्यासाठी गव्हाचे काड किंवा ज्वारीच्या भुश्श्यात चुना मिसळून त्याचा पातळ थर (गादी) अंथरल्याने गोठ्यातील आर्द्रता कमी होते व गोठा स्वच्छ व कोरडा राहण्यास मदत होऊन गाय व नवजात वासरांना ऊब मिळते.
– गोठ्यात जनावरांना ऊब मिळण्यासाठी शेकोटी पेटवावी किंवा विद्युत बल्ब लावावेत.
– छोट्या वासरांच्या अंगावर पोत्याचे पांघरून टाकावे.
– गोठ्यात सिमेंटचा कोबा असल्यास कोबा तुलनेने अधिक थंड असतो. यासाठी लहान वासरांच्या आणि व्यायला झालेल्या गायी व म्हशींच्या खाली कोरडा भुसा, पाचट, वाळलेले गवत पसरावे.
– जनावरांना उघड्यावर न बांधता बंदिस्त गोठ्यामध्ये बांधावे.
– जनावरांना सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये बांधावे किंवा मोकळे सोडावे, उन्हामुळे ऊब व ‘ड’ जीवनसत्त्वाचा पुरवठा होतो.
– जनावरांना शक्यतो दुपारी १२ नंतर धुवावे. जनावरांना खरारा केल्यास रक्ताभिसरण चांगले होऊन थंडीही कमी जाणवते.
– थंडीमध्ये पाण्याचे तापमान कमी झाल्याने जनावरे पाणी पीत नाहीत किंवा पाणी कमी पितात, त्यामुळे पिण्यासाठी जास्त थंड पाण्याचा वापर टाळावा. त्यासाठी हौदात साठविलेल्या पाण्यापेक्षा विहिरीतून किंवा कूपनलिकेतून उपसलेल्या ताज्या पाण्याचा वापर करावा, ते पाणी साठविलेल्या पाण्याच्या तुलनेत कमी थंड असते. पाण्यामध्ये गूळ किंवा मीठ किंवा ज्वारीचे पीठ मिसळून द्यावे.
– आहारात अधिक ऊर्जा देणाऱ्या खाद्यघटकांचा (उदा. ज्वारी, गहू, मका यांचा भरडा इत्यादी) वापर करावा, यामुळे शरीरात ऊर्जा निर्माण होऊन प्रतिकारशक्ती वाढते. कोरड्या चाऱ्याचे प्रमाण वाढवावे.
– आहारात प्रथिनांचा वापर २ टक्क्यांनी वाढवावा.
– खाद्यात खनिजे आणि जीवनसत्त्वे असावीत, क्षार आणि खनिज घटक पुरेशा प्रमाणात खाद्यातून अथवा चाटण्यासाठी क्षार विटा ठेवून पुरवावेत.
– दूध काढण्याअगोदर कास कोमट पाण्याने धुऊन मगच दूध काढावे.