भारत स्वतंत्र झाल्या नंतर देशात गायी संदर्भात अनेक घडामोडी झाल्या. मोठया प्रमाणात गो हत्या सुरु झाली, हळू हळू गो हत्येला व्यवसायिक स्वरूप दिले गेले. जसे जसे दिवस गेले तसे पुढे पुढे शेतकऱ्याचा देखील भारतीय वंशाच्या गायींकडे पाहण्याचा दृष्टिकोन हळू हळू बदलून गाय आणि दुग्ध व्यवसाय एवढाच मर्यादित होत गेला. गाय आणि दुग्ध व्यवसाय केवळ याच एका दृष्टिकोनातून भारतीय गायीचा विचार करण्याने भारतीय वंशाच्या गायींमध्ये लपलेले विज्ञान आणि त्यामुळे होणारा मोठा फायदा पाहण्याची क्षमताच संपून गेली. पाश्चिमात्य विचारसरणीचा पगडा वाढला, भारतीय संस्कार संस्कृती, परस्पर जीवन पद्धती याचा लोप होऊ लागला आणि देशी गायीला बेकार समजून विकणे सुरु झाले आणि भारतीय गोवंश न सांभाळण्याची विचारसरणी पक्की रुजली.
खरेतर भारतात जेवढी भारतीय गोवंशाची विविधता बघायला मिळते तेवढी दुसऱ्या कुठल्याही देशात पाहायला मिळत नाही. भारतीय गोवंशाच्या दुधाची गुणवत्ता युरोपियन प्राण्यांच्या दुधाच्या गुणवत्तेपेक्षा अत्यंत उत्तम आहे. यावर बाहेरच्या देशांनीच अभ्यास आणि संशोधन केले आणि युरोपियन होल्स्टिन आणि जर्सी या प्राण्यांच्या दुधाचे दुष्परिणाम इंटरनेटवर घोषित केले आहेत. नुसते एवढेच नाही तर भारतीय वंशाच्या गायीचे गोमय, गोमुत्र, दुध, दही, ताक, लोणी या पदार्थांचे देखील अनन्य साधारण महत्व, उपयोग आणि मनुष्य समाजास खूप मोठे फायदे आहेत.
भारतीय गोवंशाच्या दुधाची गुणवत्ता आणि अनन्य साधारण महत्व कितीही असो आत्ताची वस्तुस्थिती पाहता होल्स्टिन, जर्सी प्राण्यांच्या दुधाचा व्यवसाय एवढा फोफावला आहे की त्यामध्ये खूप मोठा बदल भारतीय गोवंशाने करायचा झाल्यास खूप मोठ्या प्रमाणावर उत्तम भारतीय गोवंशाची पैदास करणे जरुरीचे आहे.
युरोपियन होल्स्टीन आणि जर्सी प्राण्यांचा देशभर प्रचार प्रसार झाल्याचा दुष्परिणाम हा झाला की भारतीय गो वंशाचे गोमय आणि गोमुत्र विविधप्रकारे शेतीसाठी वापरले जात असे ते हळू हळू बंद झाले आणि त्याची जागा रासायनिक खतांनी घेतली आणि आज केवळ रासायनिक पदार्थांवरच शेतकरी अवलंबून राहू लागला की जे दुकानातून विकत घ्यावयास लागतात. याच्या वाढत्या खर्चामुळेच शेतकरी शेती सोडू लागले आहेत.
भारतीय गोवंशापासून मिळणाऱ्या दुधाबरोबर गोमय आणि गोमुत्राचे खूप उपयोग आहेत. त्याच्यावर वैज्ञानिक दृष्टीकोनातून संशोधनाची आवश्यकता आहे. गायीचा ज्यावेळी विषय सुरु होतो त्यावेळी तिला हिंदू धर्माशी जोडले जाते की जी चांगली गोष्ट आहे. परंतु तिला धर्माशी का जोडले गेले आहे त्याचे कारण कोणी पहात नाही. गाय ही खरेतर एकाच धर्माशी नव्हे तर संपूर्ण जागातीला मनुष्य धर्माशीच जोडलेली आहे. याच्या मागे फार मोठे विज्ञान आहे. या गायीत संपूर्ण अर्थशास्त्र बदलण्याची ताकद आहे. जे समजणे जरुरीचे आहे.