गायीचा अध्यात्म शास्त्राशी जवळचा संबंध आहे. अध्यात्म म्हणजे, मी कोण आहे ?, माझा जन्म का झाला ?, मी कुठून आलो ? आणि मला कुठे जायचे आहे ? आदी प्रश्नांची उकल करून घेणे. अध्यात्म म्हणजे, स्वतःची, “मी” ची ओळख. सर्व सामान्यपणे या गोष्टींशी गायीचा काय संबंध असा प्रश्न पडतो.
पारमार्थिक उन्नती होण्याकरिता त्याप्रमाणे जीवन शैली, जीवन पद्धती जगण्याची जरुरी आहे. त्यासाठी इष्ट, आराध्य दैवताची उपासना असावी लागते. हिंदू संस्कृतीत अनेक दैवते आहेत. त्यातील कुठलेही एक दैवत त्याचे (देवतेचे) गुण आणि तत्व समजावून घेऊन पूर्व संस्काराप्रमाणे उपासनेतून दृढ होते. त्यातील बऱ्याच दैवतांची चित्र पहाता त्यांच्या बरोबर गाय किंवा बैलाचे स्थान आहे. यात खूप मोठे गुह्य आहे. श्रीकृष्ण, प्रभू दत्तात्रेय, परशुराम यांचे बरोबर गाय असते, नवनाथांकडे गाय होती. भगवान शिव यांचे वाहन नंदी, इंद्राकडे कामधेनू आहे. याचे कारण म्हणजे गायीची सेवा म्हणजे पंच महाभुतांची उपासना. परमार्थात मनावर अभ्यास करावा लागतो. मन स्थिर करण्याचा प्रयत्न करावा लागतो. मनुष्याला रज आणि तमो गुण बाजूला सारून सात्विकतेची, सात्विक गुणांची जोपासना करायला लागते. सात्विकतेत सुख, शांती, समाधान आहे. ज्ञान आणि वैराग्य प्राप्त होण्याकरिता मन आणि बुद्धी शुद्ध, पवित्र करणे जरुरीचे आहे. परमार्थ उत्तम होण्याकरिता सद्बुद्धी, विवेकाची अत्यंत गरज आहे. काम म्हणजे इच्छा, वासना, क्रोध, मोह, लोभ, हव्यास, दंभ, आसक्ती, अहंकार हे दुर्गुण बाजूला सारण्यास अत्यंत सात्विकतेची जरुरी आहे. हे सर्व सदगुण प्राप्त होण्याकरिता गो सेवा करणे हा एक मार्ग आहे.
गाय गोमूत्र,गोमय आणि दूध ही तीन प्रमुख गव्य देते (गव्य म्ह्नणजे गायी पासून प्राप्त होणारे पदार्थ) दुधापासून दही आणि तूप बनते यांना उपगव्य असे म्हटले जाते. ही मुख्य ३ गव्य आणि २ उपगव्य यांना पंचगव्य म्हणतात. यांच्या सेवनाने मनुष्याला पावित्र्य प्राप्ती होऊ शकते. येथे पावित्र्य याचा अर्थ सात्त्विकता आहे. विज्ञानातून पाहायचे झाले तर पंच महाभूतातील ज्या तत्वाची शरीरात कमतरता असेल ते तत्व या पंचगव्याच्या सेवनाने भरून निघते. पृथ्वी, आप, तेज,वायू आणि आकाश या पंचमहाभूतांच्या मिश्रणाने समस्त भौतिक जग निर्माण झाले आहे. यातील मूल गुणधर्म प्रत्येक गव्यात आहेत. पृथ्वी = गोमय, आप = गोमूत्र, तेज = तूप, वायू = दूध, आकाश = दही.
गोमुत्र, गोमय, गोदुग्ध, गोदधि, गोघृत या पंच गव्याच्या सेवनाने शरीरात पाप रहात नाही. अन्न पाच रात्रींपर्यंत, दूध सात रात्रींपर्यंत, दही वीस रात्रींपर्यंत, तूप एक महिन्या पर्यंत मनुष्य शरीरात आपला प्रभाव ठेवते. जो सलग एक महिन्यापर्यंत गोद्रव्याविना भोजन करतो त्याच्या भोजनातील भाग प्रेतात्म्यास प्राप्त होतो. गोमाता सदा सर्वदा धर्म-अर्थ-काम-मोक्ष या चारही पुरुषार्थांना प्रदान करणारी आहे. एक दिवस गोमुत्र, गोमय, गोघृत, गोदुग्ध, गोदधि व कुशोदक याचे सेवन आणि एक दिवसाचा उपवास चांडाळासही शुद्ध करतो. देवतांनीही समस्त पाप विनाशा साठी याचे अनुष्ठान केले. यात प्रत्येक वस्तूचे क्रमश: तीन तीन दिवस भक्षण करून राहिल्यास यास “महासान्तपन-व्रत” म्हणतात. हे व्रत संपूर्ण कामनांना सिद्ध करते व समस्त पापांचा विनाश करते. केवळ गोदुग्ध २१ दिवस पिऊन राहिल्यास “कृछ्रातिक्रुछ व्रत” होते. याच्या अनुष्ठानाने मनुष्य अभीष्ट वस्तू प्राप्त करून पाप मुक्त होऊन स्वर्ग लोकात जातो. तीन दिवस गरम गोमूत्र, तीन दिवस गरम घृत, तीन दिवस गरम दुग्ध, तीन दिवस गरम वायू भक्षण करून राहिल्यास “तप्तकृच्छ-व्रत” होते. याने समस्त पापांचे प्रशमन होते. या वस्तू याच क्रमाने शीतल करून ग्रहण केल्यास ब्रह्म देवांनी सांगितल्या प्रमाणे “शीतकृच्छ-व्रत” होते. या मुळे ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. एक महिना गोव्रती होऊन रोज गोमुत्राने स्नान करावे, गोरस ग्रहण करावा, गायीं मध्येच रहावे आणि गोमातेस खाणे दिल्यावरच स्वत: भोजन करावे. याने मनुष्य निष्पाप बनतो व त्यास सर्वश्रेष्ठ गोलोक प्राप्त होतो. “गोमती-विद्येच्या” जपाने उत्तम गोलोकाची प्राप्ती होते. अनेक संत, योगी केवळ गायीचे दूध पिऊन अनेक वर्ष रहातात. कारण गायीचे दूध हा संपूर्ण आहार आहे. दुग्ध पानाने तर शरीराच्या सर्व गरजा पुरविल्या जातात. मनुष्याचे मन शांत आणि स्थिर होते.
गो म्हणजे गाय, गो म्हणजे इंद्रिय, गो म्हणजे पृथ्वी असे दोन अर्थ आहेत. श्रीकृष्ण म्हटले की गाय समोर येतेच. श्रीकृष्णांकडे नऊ लाख गायी होत्या असे म्हटले जाते. म्हणूनच त्याचे नाव गोपाल कृष्ण पडले. याचा गूढार्थ आहे की जो इंद्रियांना स्वतःच्या ताब्यात ठेऊन आहे. तो इंद्रियांच्या ताब्यात नाही. म्हणूनच श्रीकृष्ण हे संपूर्ण १६ कलांनी युक्त होते. दशेंद्रिय, पंच तत्व आणि १६ वे मन यांच्यावर प्रभुत्व ज्यांचे होते ते श्रीकृष्ण. गायीच्या सहवासाने, गव्य सेवनाने तर चापल्य, सबल शरीर, तल्लख आणि चाणाक्ष बुद्धी, सुदृढ मन प्राप्त होते. हे श्रीकृष्णांनी दाखवून दिले आहे. श्रीकृष्णांचे आणखीन एक नाव गोवर्धन असे आहे. ज्याला संसारातून परमार्थाची वाट काढायची आहे त्याने गोवर्धन केले पाहिजे. म्हणजे वेळोवेळी इंद्रिय दमन, शमन करत करत इंद्रियांची तृप्ती करून पारमार्थिक जीवन जगण्याची कला श्रीकृष्णांनी सांगितली आहे. त्यात गायीचे साहाय्य त्यांनी घेतले आणि सांगितले आहे की त्रिविध ताप सहन करत जो प्रपंचाची खोल नदी स्वबळाने पार करतो तो मला ब्रह्मचारी, योगी, संन्यासी यांच्यापेक्षा प्रिय आहे.
गोमातेची शेपटी हातात घेऊन तर्पण केल्यास पितरांना तृप्ती होऊन त्यांना स्वर्ग प्राप्ती होते. गोमाता स्वर्गारोहणाची शिडी आहे. मृत्यू कालच्या कष्टा पासून मुक्ती मिळण्यास अंतधेनु, मृत्युंजय रुद्राच्या संतुष्टीसाठी व मृत्यूजन्य कष्टा पासून वाचण्यासाठी रुद्रधेनु, ज्ञात अज्ञात ऋणातून मुक्ती साठी ऋण धेनु, मोक्ष प्राप्ती साठी मोक्षधेनु, वैतरणी सुखरूप पार करण्यासाठी वैतरणीधेनु इत्यादींचे विशेष विधीद्वारे गोदाने श्री गरुड पुराणात सांगितली गेली आहेत. सत्पात्री म्हणजे जो कोणी दान घेतलेल्या गाईस उत्तम प्रकारे सांभाळू शकेल व तिला पैशांकरीता न विकता तिच्यापासून वंशवृद्धी करेल अशास ती दान केली तर दान देणाऱ्यास ती गाय अंतकाळी मन, वाचा, कर्म यांद्वारे केल्या गेलेल्या पापांपासून मुक्त करून त्याचा उद्धार करते व त्यास स्वर्गारोहण करविते. गरुड पुराणात वृषोत्सर्गाचाही विधी सांगितला आहे.
जेथे गोमातेस सुख प्राप्त होते तेथे ती स्वतः कामधेनु बनते. गो मातेने मनुष्य रक्षणाचा भार उचलला आहे. ती मनुष्यमात्राचे कवच म्हणूनच धरतीवर उतरली. ती सर्व संकट व पाप दूर करणारी आहे. पूजा करणाऱ्यास पंचगव्य हे पूजेचा अधिकार प्राप्त करून देते तर पंचामृत हे देवत्वाला प्रतिष्ठा प्रदान करते. गृह दोष, ग्रह दोष, वास्तू दोष गो मातेच्या वास्तव्याने व पूजनाने, गोसेवेने नाहीसे होतात. म्हणून वास्तुशांत, कन्या दान, श्राद्ध कर्म वगैरे बरोबर गोदान विधान आहे.
नित्य गोमुत्र स्नान करणारा स्फुर्तीयुक्त होतो व त्याचे सर्व स्नायू ताकदवान बनतात. भगवान श्रीकृष्ण पाच दिवसांचे असताना पासून त्यांना गोमुत्र स्नान घातले जात असे. जे लोक प्रातःकाली उठून गोदर्शन करून, गोधुळीचा टीका मस्तकी लावून तिची प्रदक्षिणा करतात त्याची सर्व स्वप्ने पूर्ण होतात. नंद व यशोदेच्या गोसेवेच्या तपस्येचे फळ म्हणजे गोपाल कृष्णाची प्राप्ती. ज्याच्या घरात गाय हंबरते त्या घरातील सर्व विषाद संपतो. ज्याचा प्राण गो सन्निध असताना जातो त्यास मुक्ती प्राप्त होते. मनुष्याच्या अंतकालात, शेवटच्या क्षणी रामनाम घेण्याने जे फळ मिळते तेच फळ गो मातेच्या स्पर्शाने प्राप्त होते. गो मातेच्या प्रत्येक रोमात देवता स्थित आहेत व खुरात समस्त तीर्थराज स्थित आहेत. ज्या साधकाला श्रद्धा आणि गोप्रेम नसते त्या व्यक्तीस व साधकास पूजा, जप, तप, यज्ञ याचे फळ कधीच प्राप्त होत नाही. ज्या घरात नित्य गोसेवा होते त्या घरात ३३ कोटी देव, सर्व तीर्थ, सप्तपुरी, चार धाम हे स्थित असतात. जी लहान मुले गोसन्निध असतात त्यांचा विकास प्रतीक्षण प्रगल्भता, शांतता युक्त होतो. गाईच्या दुधाने व लोण्याने मनाची चंचलता लवकर संपते. काळ्या गायीचे दूध जो पितो तो मनुष्य गूढ रहस्य जाणू शकतो व त्यास लवकर ईश्वर सान्निध्य प्राप्त होते. काळी गाय व्यायल्या नंतरचे पहिले दूध क्षय रोग्यास किंवा श्वासाचा विकार असणाऱ्यास दिले तर त्याचा रोग संपतो.
भगवान श्रीकृष्णांनी तर गोधुल मुखात घालून यशोदेस विश्वरूपदर्शन करविले. गो धुलीच्या स्पर्शाने विश्व रहस्याची उकल होते. गो घृताचा दिवा ज्या घरात लावला जातो त्या घरातील मनुष्य मात्रास जीवनात जय प्राप्ती होते.
दररोज सकाळी पूजेमध्ये आरती करण्यासाठी गोघृताचा दिवा वापरावा. तिन्हीसांजेस देवापुढे तोंड केल्यावर आपल्या डाव्या बाजूस गोघृत निरांजन लावावे. रोज संध्याकाळी शिव आणि लक्ष्मी स्वरुपात पार्वतीचा फेरा तत्वानिशी प्रत्येक घरात त्यांच्या गणांसहीत होतो. जेथे गोघृताचा दिवा लावलेला असतो तेथे हे दोघे आशीर्वाद देतात लक्ष्मी तेथे निवास करते आणि शिव त्यांच्या गणांना त्या वास्तूचे रक्षण करण्याची आज्ञा देऊन जातात. गोघृताचे निरांजन डोळ्यांचे सरळ रेषेत साधारण तीन फूट अंतरावर ठेवून दररोज ठराविक वेळी कमीत कमी तीन महिने न चुकता त्राटक केल्यास उच्च स्तरावरील देवतांशी साधकाचा संपर्क होतो. त्या देवता पुढे त्या साधकास मार्ग दर्शन देतात व अडचणीत मदतही करतात. गोघृताचे निरांजन लक्ष्मी वृद्धी करणारे, लक्ष्मी द्योतक आहे. तिन्हीसांजेस देवापुढे तोंड केल्यावर आपल्या उजव्या बाजूस दररोज तिळाच्या तेलाचा दिवा लावावा या मुळे शिव आणि शक्ती स्वरुपातील पार्वती घरातील इडा-पिडा, बाधा, व्याधी, अशांतता यांचे हरण करतात व त्या घराचे राक्षसी प्रवृत्तीं पासून रक्षण होते. तिळाच्या तेलाचा दिवा शनि देवांचे द्योतक आहे. त्यामुळे शनिदेवही त्या घरावर कृपा दृष्टी ठेवतात आणि अरीष्टा पासून त्या घरातील प्रत्येकाचे रक्षण होते. कटकटी व दोष हळू हळू नाहीसे होतात.
हल्ली शहरांमध्ये वडा-पाव, पाव-भाजी, भेळ-पुरी, पाणी-पुरी, चायनीज वगैरे पदार्थांच्या गाडया व हॉटेल्स यांना जास्त महत्व प्राप्त झाले आहे. नेमके लक्ष्मी घरी येण्याच्या महत्वाच्या वेळेसच घरची लक्ष्मी की जे घराचे घरपण, शील, सत्व व मर्यादा आहे तीच घरात दिवे न लावता बाहेर हॉटेलात किंवा बागेत फिरायला जाते. त्यामुळेच कदाचित त्या घरामध्ये असलेली शांती, घरपण चिरकाल टिकत नाही.
तिळाच्या तेलाच्या दिव्यावर त्राटक केल्यास निम्न स्तरावरील देवतांशी उदा. गंधर्व, यक्ष, किन्नर इ. संपर्क होतो. काही लोक मेणबत्तीवर त्राटक करतात असे केल्याने पिशाच्च योनीतील आत्म्यांशी संपर्क होतो परंतु नंतर मात्र हे त्या साधकाला मोठया त्रासाला कारणीभूत ठरते. म्हणूनच आपल्याकडे मुद्दाम मेणबत्ती लावून फुंकण्याची प्रथा नाही.
भगवान श्रीकृष्ण लहान असताना यशोदा माता त्यांना बांधण्यासाठी केवळ गोमातेस बांधलेल्या दोरीचा उपयोग करत असे कारण इतर दोरखंडाने ते कधीच बांधले जात नसत. स्त्रीचे रूप हे करूणामय आहे. ज्या स्त्रीस शील नसते ती शीळा बनते. पुरुषाचा मद त्यास वृक्ष योनीत घालवितो. गाईच्या सेवेने तिचे जडत्व जाऊन तिला शील प्राप्त होते व पुरुषाला सात्विकता, विवेक प्राप्त होतो. जी व्यक्ती गोवत्साचा हिस्सा हिरावून घेतो तो वत्सासुर. गो वत्साचा अधिकार गोमातेच्या दोन आचळावर आहे. त्यामुळे उत्तम वंशवृद्धी होते. पाप कर्म ही रोग रूपाने मनुष्यास भोग देतात. जो गोमातेस शरण येतो, गोमातेची सेवा करतो त्याचे पाप काहीच फल उत्पंन्न करू शकत नाही. गोसेवा करणाऱ्याचा स्वभाव सरळ, सुस्वभाव बनतो. उत्तम गोसेवकास बुद्धीने जाणणे अशक्य आहे.
गोमाता सरळ स्वभावाची असल्याने तिच्या सन्निध गोपाल आहेत. ज्यास गोविंदांना भेटण्याची इच्छा आहे त्याने गोसेवा करणे इष्ट आहे. कारण तिच्या सेवेत स्वत: गोवर्धन गिरिधारी आहेत. ज्या दिवशी भगवान श्रीकृष्ण गोपाल बनले व गाईंना घेऊन पहिल्यांदा त्यांना चरावयास बाहेर पडले तो दिवस म्हणजे कार्तिक शुद्ध अष्टमी तीच गोपाष्टमी. धेनुकासुर म्हणजे गोहत्या करणारा त्याच्या मुळे म्हणजेच गोहत्या करणाऱ्याच्या सहवासाने संयम, नियम, आचार, विचार नष्ट होतात. म्हणूनच कली युगात जप,तप, धर्म, यज्ञ, दान, यांचे फल त्वरित मिळत नाही. पंच महाभूतांपासून मनुष्याची पंचेंद्रिय बनली. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, यांच्या पासून गंध, रस, रूप, स्पर्श, शब्द यांचे ज्ञान होते. ही सर्वच तत्वे गोमाता शुद्ध करते. तिच्या हंबरण्याने शब्द शुद्धी होते. ती श्वासातून ऑक्सिजन सोडते त्याने वायू शुद्धी होते, गोघृत सेवनाने मनुष्य शरीरातील अग्नि तत्व (तेज) शुद्ध होते, गोमुत्राने जल (आप) शुद्धी होते, गोमयाने सर्व पृथ्वी आणि गोमय स्नानाने मनुष्य देह आणि त्यातील पृथ्वी तत्वाची शुद्धी होते. गोमातेच्या शरीरातून जो गंध येतो. त्यामुळे मनुष्य मनकमल विकसित होते व अशुभ संपून वर्तमान व भविष्य सुधारते. म्हणून गोमाता दर्शन, स्पर्श, नमन, प्रदक्षिणा, पूजा व गोधुली लेपन यास फार महत्व आहे. गाय वीत असताना प्रदक्षिणा केल्यास पृथ्वीची प्रदक्षिणा केल्याचे फल मिळते व मुक्तीचा मार्ग सुलभ होतो.
गो संरक्षणानेच पुरुषार्थ व बल याची परीक्षा होते. असाच मनुष्य कुलास तारणारा समाजाला पाहिजे. गोमातेस तृप्त करून मग स्वत: जेवणाऱ्याची पचन शक्ती उत्तम रहाते व त्याचे पचन सुलभ होते. गायी चारा खाताना तिच्या गळ्यातील घंटा नादाने त्या घरातल्या सर्व विपत्ती दूर होतात. जर एखाद्याने तिला जवळ जाऊन खाऊ घातले तर त्या नादाने त्या माणसाचे निकटवर्ती होणारे रोग, विपत्ती नष्ट होतात. ज्या घरास विपत्तीतून बाहेर काढावयाचे आहे. त्याच्या घरात गाय बांधावी. गाईस जलपान करविणारा, प्रात:काळी गोघृतात स्वत:चे मुख पाहणाऱ्याचे दु:ख नाहीसे होते व नशीबातील दारिद्र्यही नष्ट होते.
माता राधायोगेश्वरी गोमाता रुपात भूतलावर अवतरीत झाली. साधक सिद्ध बनण्याच्या प्रवास करत असताना त्याला गोरस म्हणजे गोदुग्ध हा सात्विक पूर्णाहार सेवन केल्याशिवाय प्रगती होत नाही. गायी व बैल यांच्या खुरात नित्य नागांचा निवास असतो की जे स्वत: श्वासाने विष खेचून घेतात. म्हणून बैलास शेतीसाठी वापरले गेल्यास त्या शेत जमिनीतील विषारी तत्वे बैलांच्या खुरांनी नाश पावतात. तसेच शेतातील पिकाला हानिकारक असलेली, नको असलेली गाजर गवता सारखी झुडपे बैल आणि गायींच्या मुत्राने नाश पावतात. लोखंडाच्या भांड्यात गोमुत्र उकळून बनविलेली उटी मधुमेहास उपकारक आहे. मधुमेहासारखे रोग ही उटी नष्ट करते. गोमाता नवजीवन देणारी आहे. मनुष्याची आई स्वत:च्या बालकास काही काल पर्यंत दूध देते. परंतु गोमाता माणसाच्या शेवटपर्यंत सगळ्यांनाच दूध देते.
समुद्र मंथनातून सुरभी कामधेनु प्राप्त झाली. भगवान शिवांच्या डाव्या बाजूस मांडीवरती पार्वती माता आहे जे गोरूप आहे आणि सर्वच देव गायीत सामावलेले आहेत तीच शक्ती शिवांची आहे. गो म्हणजेच पृथ्वी, गो म्हणजेच इंद्रिय भगवान शिव हे इंद्रियांवर संपूर्ण विजय प्राप्त केलेले, पूर्ण वैराग्य धारण केलेले. म्हणजे तीच ही शक्ती पृथ्वीमाता त्यांनी धारण केलेली आहे. शिव धर्मावर आरूढ म्हणजे नंदीवर बसलेले आहेत की जो गायीपासून उत्पन्न झालेला आहे, जो गायीचा वंश आहे. म्हणूनच शिव हे धर्माचे दर्शन घडवितात की जो धर्म गोमातेस अनुसरून आहे.
जो गायरान जमीन दान करतो किंवा गायींच्या रहाण्यासाठी व्यवस्था करतो, त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करतो तो भय रहित होऊन वाजपेय यज्ञाचे फळ प्राप्त करतो. गायीचे दूध हृदयास बल देणारे आणि नेत्रज्योती वाढविणारे आहे. गोघृत शरीरास अविकारी बनविणारे, आयु वृद्धी करणारे आहे. एखाद्या घरातील स्त्री गोभक्त असेल तर ती सर्व घराला व दोन्ही कुळांना तारते. अशा घरातील संपत्ती वृद्धिंगत होते. गाईच्या शेपटीपर्यंत सूर्य,केतू नाडी आहे म्हणून गाईच्या शेपटीस पकडून तर्पण केले असता सूर्याशी संबंध येतो व मनुष्यास स्वर्ग प्राप्ती होते.
गोमुत्र फार गुणकारी आहे ही अनुभवसिद्ध गोष्ट आहे. गोमुत्र पान आणि स्नान केल्याने शारीरिक व मानसिक दोन्ही रोग नाहीसे होतात. गोमुत्र तलम कापडाने १०८ वेळा गाळून प्यायल्यास मनाचा मल दूर होतो. मनातील पाप दूर होते व मन शुद्ध बनते. हा प्रयोग सलग सहा महिने करावा. या प्रयोगाने स्वभावात परिवर्तन होते. गोमुत्रात दिव्य शक्ती असल्याने ते स्वभाव व बुद्धी निरोगी बनविते. तसेच गायीचे शेण शरीरावर चोळल्याने ते अनावश्यक उष्णतेचे शोषण करते व त्वचा नरम, गोरी होते. ज्या स्त्रिया गोसेवा करतात त्या शील संपन्न, लाघवी बनतात. सर्वच युगात गोधन ही दैवी संपत्ती आहे.
पाश्चिमात्य संस्कृतीचा पगडा विशेष करून मोठया शहरातून पहायला मिळतो. पाश्चिमात्य संस्कृतीचे सर्रास अंधानुकरण करताना लोक दिसतात, यातच त्यांना इति कर्तव्यता, सुख, समाधान वाटू लागले आहे. वाढदिवस साजरा करण्यासाठी हे लोक मैदा, अंडे घालून बनविलेला केक आणायचा त्यावर मेणबत्त्या लावायच्या आणि फुंकायच्या मग टाळ्या वाजवायच्या, ओरडायचे त्या केकवरील क्रीम एकमेकांच्या तोंडाला फासायचे वगैरे गोष्टीत वाढदिवस साजरा केला म्हणतात व आनंद मानतात. बरेच ठिकाणी स्वत:कडे व्यवस्थित जागा असूनही देवांचा देव्हारा भिंतीवर ठोकून अधांतरी टांगलेलाच असतो. त्यात वाढदिवसाच्या निमित्ताने घरात गर्दी असल्याने देवापुढे त्याच दिवशी दिवा लावायला वेळच नसतो. मग नेमके हे मेणबत्तीच्या ज्योती फुंकण्याचे काम त्या वाढदिवस असणाऱ्या कडून बरोबर तिन्हीसांजेसच करून घेतात. असो.
काळाप्रमाणे चालून आपली संस्कृती टिकवून वाढदिवस साजरा करण्याच्या एक मार्ग आहे. पहिल्यांदा वाढदिवस हा तिथी प्रमाणे म्हणजे जन्म तिथीलाच करावा. म्हणजे त्या दिवशी जन्माच्या दिवशीच्या ग्रहमाना प्रमाणे सर्व ग्रह आकाशात स्थित असतात. जन्म तारखेस असे असतेच असे नाही. सकाळी आंघोळ करून गोघृताचे निरांजन देवापुढे लावावे व दुसऱ्या गोघृताच्या निरांजनाने वाढदिवस असणाऱ्याचे तोंड पूर्वेकडे करून त्याच्या आईने किंवा घरातील व्यक्तीने ओवाळावे. यामुळे वाढदिवस असणाऱ्या व्यक्तीची आयुष्यवृद्धी होते, आकाशस्थ सर्व ग्रह त्या जीवाला आशीर्वाद देतात. नंतर यथाशक्ती स्वत: त्या व्यक्तीने किंवा ब्राह्मणद्वारे कुलदेवता, आराध्य देवता किंवा घरचे देव यांचेवर घरातच षोडश उपचार पूजा, अभिषेक, लघुरुद्रादि, सत्यनारायण, पवमान, नवग्रह हवन, विशिष्ठ संख्या धरून सामुहीक जप, एखाद्या स्तोत्राचे पाठ वगैरे कार्यक्रम करावा. संध्याकाळी १ किलो रवा, १ किलो गायीचे तूप, १ किलो साखर याचा गाईच्या दुधात शिरा करावा नंतर त्यात केळ, चिक्कू हंगाम असल्यास आंबा अशा फळांच्या फोडी, सीताफळाचा गर वगैरे घालावा मग हा शिरा एका भांड्यात मोठया पात्रात भरून त्याला केकचा आकार द्यावा व त्याचा नैवेद्य देवास दाखवावा. मग बरोबर तिन्हीसांजेस गोघृताच्या निरांजनाने आमंत्रित केलेल्या वयाने मोठया सर्व व्यक्तींकडून वाढदिवस असणाऱ्यास ओवाळावे व त्यांचे आशिर्वाद घ्यावेत. मग केक प्रमाणे केलेले खाद्य सुरीने भाग करून सर्वांना द्यावे. पहा काय आनंद मिळतो.