गाय आणि गोसेवा

गोपालन आणि गोसंवर्धन हे दोन्ही शब्द वरकरणी एकाच वाटत असले तरीही या दोन्ही शब्दांचे अर्थ वेगळे आहेत. गोपालन करणारा जो असतो तो गोसंवर्धन करणारा असेलच असे नाही.

गोपालन म्हणजे गायी पाळणे अर्थात त्या व्यक्तीकडे आर्थिक आणि जागेचे नियोजन / व्यवस्था आहे म्हणून त्याने गायी ठेवल्या आहेत परंतु तो रोज त्या गायींना स्वतःहून खाणे, पिणे त्यांचे बाळंतपण करणे आदी रोजचे काम करत नसतो.

परंतु गोसंवर्धन करणारा मात्र दररोज त्या गायींना स्वतःहून खाणे, पिणे त्यांचे बाळंतपण करणे, त्यांचे आजारपणात औषधपाणी करणे, पोषक आहार आदी आदी रोजचे काम करत असतो.

भारतात अनेक ठिकाणी अनेक प्रकारच्या गायींच्या जाती आढळतात. त्या त्या प्रकारच्या गायींचा सांभाळ त्या त्या ठिकाणी केला जावा हे उत्तम. ज्यावेळी त्या गायींचे स्थान आणि वातावरण बदलले जाते त्यावेळी तिच्या उत्पादकतेत निश्चित बदल होतो. म्हणून शक्यतो त्या त्या प्रांतातील गायींचा सांभाळ, पालन / संगोपन त्या त्या प्रांतातच केले जावे.

सर्व गोभक्त, गोपालक, गोसेवक, गोसंवर्धक, गोरक्षक यांनी गाय सांभाळणे, गो व्यवस्थापन, गोसंवर्धन याबाबतची संपूर्ण माहिती घेऊनच स्वतःचे कार्य सुरु करावे. म्हणजे उत्तम गोवृद्धी होईल यात शंका नाही. गौ पालन / गौ संवर्धन म्हणजे केवळ गायींना नुसती खाण्यापिण्याची सोय करून त्यांचा शेण गोठा करणे एवढेच नव्हे तर त्यांची सर्व प्रकारे उत्तम काळजी घेऊन त्यांचे वर्धन करणे आहे. कर्माचे वर्म माहित करूनच कामाला सुरुवात केली तरच उत्तरोत्तर उत्तम गोवंश देखील तयार होईल आणि समस्त मनुष्य समाजाला त्याचा फायदा होईल